Ashish Shelar: 1 हजार नव्हे तर 3 हजार कोटींचा घोटाळा, वांद्रे बॅन्डस्टँड भूखंड घोटाळयाप्रकरणी शेलारांचा पुन्हा आरोप
Ashish Shelar: आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. यापूर्वी शेलार यांनी 5 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन वांद्रे बँडस्टँड भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता.
मुंबई: वांद्रे बँडस्टँड घोटाळ्यावरून भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर आरोप केला आहे. वांद्रे पश्चिम बॅन्डस्टँड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणाऱ्या सरकारी मालकीचा भूखंड बिल्डरच्या घशात घालून सुमारे एक नव्हे तर 3 हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या पंचतारांकित जागेवर “एसआरए” (SRA) योजना दाखवून एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय (FSI) बिल्डरला देण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच आघाडी सरकार हे ‘ठग्ज् ॲाफ महाराष्ट्र’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. पंचतारांकित जागेवर “एसआरए” दाखवून सरकारकडून एफएसआयची खैरात करण्यात आली आहे. मंत्रालयातील 6 व्या माळ्यावर बसणाऱ्या कुठल्यातरी मंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे शक्य नाही. एवढ्या फाईल स्पीडने धावत असतील तर मग रूस्तमजीचा खरा ‘आका’ कोण?, असा सवालही शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. यापूर्वी शेलार यांनी 5 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन वांद्रे बँडस्टँड भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात 1 हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत खुलासा उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी करुन यामध्ये कोणत्याही प्रकारे घोटाळा झाला नसल्याचे प्रसिध्दीपत्रक जारी केले होते. त्या खुलाशाला आज उत्तर देणार नाही, योग्य वेळी आपण त्यावर बोलू असे सांगत शेलार यांनी याच घोटाळयातील आणखी एक गंभीर बाब उघड करुन नवीन आरोप केले आहेत.
एसआरए योजनेचा फायदा घेतला
या भूखंडावर 168 कायम स्वरुपी संक्रमण शिबिरातील घरे बिल्डर बांधून देणार असे दाखवून सदर मोकळया भूखंडावर एसआरए योजना राबविण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संक्रमण शिबिराच्या नावाखाली विकासकाला एसआरए योजनेचे फायदा देण्यात येणार आहेत, असा दावा शेलार यांनी केला.
हेच का तुमचे करून दाखवले
सदर भूखंड मोकळा भूखंड म्हणून विकसीत केला तर विकासकाला 1 लाख 90 हजार चौरस फुट एवढे क्षेत्रफळ विक्रीसाठी मिळणार होते. मात्र या जागेवर एसआरए दाखवून 33 (11) अंतर्गत विकास केल्यास विकासकाला 3 लाख चौरस फूट एवढे प्रचंड क्षेत्रफळ विक्रीस मिळणार आहे. जर हा भूखंड रिकामा भूखंड म्हणून विकसित केला तर 2 एफएसआय मिळाला असता. पण एसआरए योजनेत दाखविल्यामुळे आता 4 एफएसआय बिल्डरला मिळणार आहे. सरकारकडून अशा प्रकारे 4 एफएसआयची खैरात तसेच मालकी हक्काने भूखंड बिल्डरला दिल्यामुळे 42 मजली टोलेजंग टॉवर या जागेवर उभा राहणार आहे. यामुळे विकासकाला सुमारे 3 हजार कोटींचा फायदा होणार आहे. या बदल्यात सरकारला 28 कोटी भरुन हा भूखंड केवळ 234 कोटीला मालकी हक्काने बिल्डरला मिळणार आहे. म्हणजे कवडीमोल किमतीत हा भूखंड विकासकाच्या घशात घालण्यात येतो आहे. हेच “का ते तुमचे करुन दाखवले”, असा टोलाही त्यांनी लगावला.
घोटाळ्याची चौकशी करा
या संपूर्ण प्रकरणात धर्मदाय आयुक्त, एसआरए, उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगरपालिका यांचा सहभाग असून या सर्व प्रशासकीय कार्यालयातून ज्या वेगाने परवानग्या देण्यात येत आहेत. ते पाहता मंत्रालयातील कोणी उच्च पदस्थच ही सूत्रे हलवित आहे हे अधोरेखित होते. त्यामुळे तातडीने या प्रकरणाची चौकशी व्हावी. एसआरएकडून या भूखंडावरील योजनेला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रकरण नेमकं काय?
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात बँन्ड स्टँन्ड परिसरात असणाऱ्या ताज हॉटेलच्या शेजारील 1 एकर 5 गुंठे हा भूखंड सन 1905 पासून THE BANDRA PARSI CONVALESCENT HOME FOR WOMEN & CHILDREN CHARITABLE TRUST ला भाडे पट्ट्यावर देण्यात आला होता. आजारी रुग्णांना बरे करण्यासाठी ही राखीव जागा या ट्रस्टला देण्यात आली होती. या ट्रस्टने सदर कामासाठी जागेचा वापर केलाच नाही. तर सदर जागेचा भाडेपट्टा हा 1980 साली संपला. मुंबई महापलिकेच्या विकास आराखडयात या जागेचे आरक्षण Rehabilitation Centre असे आहे. सदर ट्रस्टचा भाडेपट्टा करार संपल्यामुळे ही जागा सरकारच्या ताब्यात येण्याची प्रक्रिया होत असतानाच 2020 साली ही जागा विकण्याची जाहीरात काढण्यात आली. व त्यानंतर 2022 पर्यंत सरकारने ही जागा विकण्याच्या सर्व परवानग्या दिल्या. वास्तविक या जागेवर ऐतिहासिक दर्जा असलेली वास्तू होती ती तोडून तसेच याबाबत कोणत्याही परवानग्या न घेताच हा भूखंड रुस्तमजी या बिल्डरच्या घशात घालण्यात आला. असाच काही वर्षापूर्वी ऐतहासिक वास्तुचा दर्जा असलेली क्रॉफर्ड मार्केटचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्यात येत असताना शेलार यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे तो भूखंड अखेर वाचला होता. तसाच एक घोटाळा आता वांद्रे येथील जागेचा सुरू असल्याचे त्यांनी आता उघड केले आहे.