छत्रपतींची तुलना शिंदेबरोबर करणं, या मुद्यावर आम्ही असहमतच, भाजप नेत्याने शिंदे गटाला फटकारले
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना या पृथ्वीतलावर आता कोणाशी करावी अशी कोणतीच व्यक्ती सध्याच्या काळात नाही.
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नंतर सुधांशू त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. एकीकडे हे वाद सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदारांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केल्याने आणखी एक वाद उफाळून आला आहे.
या वादावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी बोलाताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर आताच्या काळातील कोणत्याच व्यक्तीची तुलना होऊ शकत नाही असं स्पष्टपणे सांगत शिंदे गटापेक्षा आपली भूमिका वेगळी असल्याचेही जाणीव त्यांनी यावेळी करून दिली.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना आणि वादग्रस्त वक्तव्याबद्दल बोलताना त्यांनी शिंदे गटातील नेत्यांकडून व्यक्त झालेल्या मतांशी आम्ही सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना या पृथ्वीतलावर आता कोणाशी करावी अशी कोणतीच व्यक्ती सध्याच्या काळात नाही.
त्यामुले ते एकमेवाद्वितीय आमचे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय असल्यामुळेच त्यांच्याशी कोणाचीही तुलना करण्याच्या भूमिकेबद्दल जर कोणी भूमिका मांडली असेल तर त्यांच्याशी आम्ही असहमत आहे असंही त्यांनी स्पष्टच सांगितले.
यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर करत त्यांनी केलेला गनिमी काव्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनीही गनिमी कावा केला आहे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.