ठिणगी पडली ! निधी वाटपावरून संताप, भाजप आमदाराचा थेट राजीनाम्याचा इशारा; फडणवीस यांना पाठवलं पत्र
निधी वाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना मी आज भेटणार आहे. कदाचित त्यांना या निधीची माहिती नसेल. उपमुख्यमंत्र्यांनाही अंधारात ठेवून हा निधी दिला असावा. असंच होणार असेल तर मला राजीनाम्याशिवाय पर्याय नाही.
मुंबई : ज्या निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झिडकारत बंड केलं. त्याच निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपच्या आमदाराने संताप व्यक्त केला आहे. आपलं पत्र नसताना दुसऱ्याच्या पत्रावर आपल्या मतदारसंघात निधी वाटप करण्यात आल्याने आमदाराने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या आमदाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हा आमदार नाराजी व्यक्त करून थांबला नाही तर त्याने थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
वर्ध्यातील आर्वीचे भजापचे आमदार दादाराव केचे यांनी हा इशारा दिला आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारकडून निधी देण्यात आला आहे. पण या निधीसाठी दादाराव केचे यांनी कोणतंही पत्र दिलं नव्हतं. दुसऱ्यांच्याच पत्रावर हा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपलं पत्र नसताना दुसऱ्याच्या पत्रावर निधी देणं हा आपला घोर अपमान आहे, असं सांगत असंच जर होत असेल तर नाईलाजास्तव मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा दादाराव केचे यांनी दिला आहे.
फक्त कारंजाला निधी मिळाला
यावर दादाराव केचे यांनी टीव्ही9 मराठीशी संवादही साधला. माझ्या मतदारसंघातील आमच्या मतदारांनी 2009 ते 2014 मध्ये मला विजय मिळवून दिला. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी विजयी केलं. 2019मध्येही मी विजयी झालो. आर्वी, आष्टा, कारंजा हे तीन भाग माझ्या मतदारसंघात येतात. आर्वी, कारंजा आणि आष्टा नगरपालिका आणि पंचायतीसाठी मी निधी मागितला होता. आष्टी आणि आर्वीसाठी निधी दिला नाही. आष्टीसाठी 5 कोटी आणि आर्वीसाठी 5 कोटीच्या विकास निधीची मागणी केली होती. पण फक्त कारंजासाठी 5 कोटीचा निधी मिळाला. आष्टी आणि आर्वी नगर परिषदेला पाच पाच कोटी मिळाले नाही, असं केचे म्हणाले.
हा माझा घोर अपमान
माझं पत्र नसताना 12 एप्रिल 2023 ला निधी देण्यात आला. आर्वीचा मी दुसऱ्यांदा आमदार आहे. माझ्या पत्राशिवाय विकास निधी देऊ नये असं माझं मत आहे. तरीही माझं पत्र नसताना निधी दिला. पत्र न देता निधी दिला ही शोकांतिका आहे. हा माझा घोर अपमान आहे. त्यामुळेच असं असेल तर मला राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं त्यांनी सांगितलं.
निर्णय रद्द करा
आम्हाला तिकीटाची चिंता नाही. मतदारसंघात एकही कार्यकर्ता नसताना संघटना बांधली. आता सर्वांना हिरवळ दिसू लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघावर अनेकांचा डोळा आहे. म्हणून या मतदारसंघावर अघात केला जात आहे. मला जाणीव नसताना निधी दिला. हा आमदार म्हणून माझा घोर अपमान आहे. मी उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. आष्टी आणि आर्वीला आधी निधी द्या. मग इतर निधी द्या. माझं पत्र असल्याशिवाय माझ्या मतदारसंघात निधी देऊ नका. आता जो दुसऱ्यांच्या पत्रावर निधी दिला तो निर्णय रद्द करा, अशी मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं.