मुंबई (महेश सावंत) : ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. याच टीकेला भाजपाकडून उत्तर देण्यात आलय. “अनेकांचा बुरखा फडण्याचे काम फडणवीस साहेबांनी केले. जो, आपल्या आयुष्यात कधीच खर बोलला नाही, तो फडणवीस साहेबांवर टीका करतो. राऊतांमध्ये हिम्मत असेल तर खुल्या व्यासपीठावर यावं” असं आव्हान भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिलं. नितेश राणे ठाकरे गटावर नेहमीच बोचरी टीका करतात. टोचणाऱ्या शब्दांचा ते वापर करतात. आज संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना नितेश राणे यांचा तोल ढासळला. “संजय राऊतने आमदारांना फोन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको म्हणून सांगा आणि आपलं नाव पुढे केले होते” असा दावा नितेश राणे यांनी केला.
“उद्धव ठाकरेंच नाव सुचवा, असं सिल्वर ओकमध्ये जाऊन कोण रडलं, हे सुद्धा आम्ही सांगू. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार हे जेव्हा संजय राऊत यांना समजलं, तेव्हा त्याने उद्धव ठाकरेंना काय काय शिव्या घातल्या याचे पुरावे आम्ही देऊ” असं नितेश राणे म्हणाले. “संजय राऊत मोठा खोटारडा आहे. घर चालविण्यासाठी शिंदे साहेबांकडून पैसे घ्यायचा” असा दावा नितेश राणे यांनी केला. “पत्रकारितेला काळिमा फासतात. चीन व पाकिस्तानच्या बाजूने अग्रलेख लिहितात. सामना वृत्तपत्रात येणारा पैसा कुठून येतो त्याची चौकशी करावी, राऊत सतत देश विरोधी भूमिका घेतोय” असं नितेश राणे म्हणाले.
‘साडेसात नंतर एकत्र येणारे मित्र’
“संजय राऊत व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संजय सिंह यांच्याबद्दल सहानुभूती आहे. कारण ती, नाईट लाईफ गँग, बेवड्या लोकांची गँग आहे. साडेसात नंतर एकत्र येणारे मित्र आहेत” अशा शब्दात नितेश राणेंनी पातळी सोडून टीका केली. “अजित दादांवर आता टीका केली जात आहे. एकत्र होते तेव्हा 70 हजार कोटी दिसले नाहीत का? आमच्या वर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ते बघा” असं नितेश राणे म्हणाले. “कुठल्याही सरकारला यापूर्वी जमलं नाही ते आमच्या सरकारने केले. काँग्रेसचे स्वतःच आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. राज्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित दादा सक्षम आहेत” असं नितेश राणे म्हणाले.