मुंबईः संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समस्त आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा, डॉक्टरांचा (Doctors) अपमान केला आहे. त्यांनी या जनतेची माफी मागायलाच पाहिजे, असं वक्तव्य भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलंय. संजय राऊत यांनी कोरोना काळात डॉक्टरांच्या कामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून समस्त डॉक्टर समूहातर्फे त्यांच्यावर सडकून टीका केली जातेय. हाच मुद्दा भाजपने उचलून धरलाय. डॉक्टरांबद्दल असं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांनी महाराष्ट्राची माफी मागायलाच पाहिजे, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली.
आशिष शेलार म्हणाले, ‘ संजय राऊत बेताल, पातळीसोडून, असंबंध बोलतात, हे दुर्दैवी आहे. ज्या डॉक्टरांनी, मेडिकल स्टाफने कोरोना काळात खऱ्या अर्थाने स्वतःचा जीव धोक्यात घालून राज्याची आणि जनतेची सेवा केली. त्यांच्या बद्दल अपमानास्पद बोलयाचं, अहंकाराचा परमोच्च बिंदू यांनी गाठलाय. जनता यांना माफ करणार नाही. डॉक्टरांनी जर आंदोलनाचा इशारा दिला असेल तर त्यांना आमचं समर्थन आहे.
आंदोलनातल्या मागण्याही चुकीच्या नाहीयेत. संजय राऊत यांनी डॉक्टरांची माफी मागितलीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ईडीने पाठवलेल्या नोटिशीसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सदर वक्तव्य केलं. कोरोना काळात डॉक्टप आणि परिचारिकांनी पळ काढला होता, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. त्यावरून आज त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय. कोरोना काळात डॉक्टरांची कमतरता होती, असं मला म्हणायचं होतं, असं ते म्हणालेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रकल्पांचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप शिवसेनेतर्फे केला जातोय. त्यावरून आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ खाई त्याला खवखव, उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे उद्धवजींच्या शिवसेनेने करू नयेत.
स्वतःचं सरकार होतं तेव्हा काही केलं नाही. दावोसमध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधींची गुंतवणूक आणली आहे. लाखो मुंबईकरांची स्वप्नपूर्ती होतेय, त्यात मी कुठेय, हे दाखवण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे, त्यासाठीच हे आरोप आहेत. जीभ नाकाला लावण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिलाय.