पाकिस्तानच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक
मुंबई : क्रिकेट सट्टा प्रकरणी ठाण्याच्या भाजपा पदाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विकास दाभाडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. विकास दाभाडे हा ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 22(ड) चा भाजपा पदाधिकारी आहे, तसेच तो ठाणे महापालिकेतील एक मोठा ठेकेदारही आहे. दाभाडेने महापालिका निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढविली असल्याचेही सांगण्यात येत आहे. 26 सप्टेंबर 2018 ला वसईच्या वालीव पोलिसांनी […]
मुंबई : क्रिकेट सट्टा प्रकरणी ठाण्याच्या भाजपा पदाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विकास दाभाडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. विकास दाभाडे हा ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 22(ड) चा भाजपा पदाधिकारी आहे, तसेच तो ठाणे महापालिकेतील एक मोठा ठेकेदारही आहे. दाभाडेने महापालिका निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढविली असल्याचेही सांगण्यात येत आहे.
26 सप्टेंबर 2018 ला वसईच्या वालीव पोलिसांनी विकास दाभाडेवर जुगार कायद्याअंतर्गत कलम 4, 5 आणि इंडियन टेलिग्रॅम अॅक्ट 1985 च्या कमल 25 (क) नुसार गुन्हा दाखल केला होता. आशिया कप ट्रॉफीतील बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तानच्या वन डे सामन्यावर विकास दाभाडे काही लोकांसोबत मिळून सट्टा लावत होता. पालघर गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच त्यांनी सट्टा सुरु असलेल्या ठिकाणी धाड टाकली, मात्र दाभाडे तेथून पळ काढण्यात यशस्वी झाला.
त्याठिकाणाहून पालघर गुन्हे शाखेने 10 जणांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान विकास दाभाडेचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी दाभाडेचा तपास सुरु केला. अखेर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी विकास दाभाडेला ठाण्यातून अटक केली. त्यानंतर त्याला वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत दाभाडेसोबत या प्रकरणात आणखी कोण सहभागी होते याचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले असल्याचे वकिलांनी सांगितले. मात्र या प्रकरणी पालघर पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.