धगधगती मशाल सगळ्यांना जाळून टाकेल, अनिल परबांनी दिला इशारा
तिन्ही पक्ष बिनविरोध पोटनिवडणूक व्हावी म्हणून आवाहन करू, असंही अनिल परब यांनी सांगितलं.
मुंबई : ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं. मशाल हे चिन्हं मिळालं. त्यानंतर प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले, आम्हाला जे चिन्ह आणि नाव मिळालंय त्यावर पोटनिवडणूक लढणार आहोत. धगधगती मशाल सगळ्यांना जाळून टाकेल, असा इशारा ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनिल परबांनी दिलाय. मतपेटीतून जी आग उसळेल त्यात विरोधक जळतील, असंही त्यांनी म्हंटलंय.
तत्पूर्वी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, रमेश लटके यांचे निधन झाले. रिक्त जागेसाठी पोटनिवणूक जाहीर झाली आहे. तीन नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे ही निवडणूक लढवण्यात येत आहे.
मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, अनिल परत, राष्ट्रवादीच्या राखी जाधव उपस्थित होते. सकाळी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, अमित देशमुख यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेतली. पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनीही ठाकरे यांच्या शिवसेनाला पाठिंबा दिलाय.
गुरुवारी १३ तारखेला नामांकन भरले जातील. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे नेते येतील. सदस्य या कालावधीत मृत पावला तर त्याच्या घरचा कुणीही उभं राहिल्यास निवडणूक बिनविरोध होत होती. पण, कोल्हापुरातल्या जागेत पोटनिवडणूक झाली. नांदेडमध्येही पोटनिवडणूक झाली. तिन्ही पक्ष बिनविरोध व्हावी म्हणून आवाहन करू, असंही अनिल परब यांनी सांगितलं.
एकतर्फी निर्णय होऊ नये, यासाठी कॅव्हेट दाखल केली जाते. शिवसेना निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात गेली आहे. अर्ज भरण्याची तारीख जवळ आली आहे.
बाळासाहेबांच्या पक्षाला सोडून जाणाऱ्यांना बाळासाहेबांचं नाव आणि शिवसेना ही नावं वगळून त्यांनी निवडणुकीला सामोर जावं. लोकांना ठरवू द्या. शिवसेना, बाळासाहेबांच्या नावानं निवडून आले आहेत.
उद्धव, बाळासाहेब ही नावं सोडून राजीनामे देऊन निवडणूक लढवावी. लोकांना ठरवू द्या. आमची भूमिका बरोबर आहे की, चुकीचं आहे. असं आवाहन अनिल परब यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिलं.