मुंबईवर ‘या’ 2 दिवशी ‘तौत्के’ चक्रवादळाचं संकट, बीएमसी आयुक्तांचे सतर्कतेचे आदेश
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात ‘तौकते’ नावाचं चक्रीवादळ तयार होत आहे.

मुंबई : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात ‘तौत्के’ नावाचं चक्रीवादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ 15 आणि 16 मे 2021 रोजी मुंबईजवळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या नेतृत्वात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे व योग्य ती कार्यवाही केली जात आहे (BMC alert about Tauktae Cyclone in Mumbai for two days).
@Indiametdept uses best prediction models for cyclone forecasts supported by observations including Doppler radars at Trv, Kochi, Goa, Mumbai & Bhuj & well trained forecasters & staff on duty 24X7 in spite of COVID restrictions Commitments by @Indiametdept & @moesgoi
— Madhavan Rajeevan (@rajeevan61) May 14, 2021
या अंतर्गत प्रामुख्याने धोकादायक झाडांची छाटणी करणे, समुद्रकिनाऱ्याजवळील पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी उदंचन संचाची व्यवस्था करणे, मुख्य 6 चौपाट्यांवर पूरबचाव पथके साधनसामुग्रीसह तैनात ठेवणे, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवणे आणि या अनुषंगाने नागरिकांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे नागरिकांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार काटेकोरपणे आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी विनंती करण्यात आलीय. तसेच नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असंही आवाहन करण्यात आलं.
मुंबईकरांनो,
आम्ही सूचित करू इच्छितो की १५ व १६ मे, २०२१ रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे.
लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल.#MyBMCVaccinationUpdate #WeShallOvercome #MyBMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 14, 2021
‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केलेल्या उपाययोजना
1. जंबो कोविड सेंटरसह इतर परिसरातील धोकादायक 384 वृक्षांची छाटणीः
कोविड बाधित रुग्णांना अधिक प्रभावी औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या जंबो कोविड सेंटरच्या परिसरालगत असणाया धोकादायक वृक्षांची छाटणी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे करण्यात आली आहे. यानुसार भायखळा व मुलुंड परिसरातील रिचर्डसन आणि क्रुडास, एन.एस.सी.आय. डोम, एम.एम.आर.डी.ए., बीकेसी जंबो, नेस्को जंबो कोविड सेंटर, दहिसर जकात नाका, कांदरपाडा, शीव, मालाड, कांजुरमार्ग इत्यादी ठिकाणी असणाऱ्या जंबो कोविड केंद्रांलगतच्या 384 झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर ठिकाणी असणाऱ्या धोकादायक झाडांची छाटणी देखील करण्यात येत आहे. वेगाने वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या पडण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेऊन आवश्यक ते मनुष्यबळ साधनसामुग्रीसह व वाहनांसह उपलब्ध करुन घेण्यात आले आहे.
2. समुद्रकिनाऱ्या जवळील वस्त्यांबाबत सतर्कता व सुसज्जताः
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारी असणाऱ्या ज्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, त्या वस्त्यांबाबत विभागस्तरीय कार्यालयांद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागातील तात्पुरत्या निवाऱ्याची ठिकाणे स्वच्छ करुन सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व 24 विभागीय नियंत्रण कक्ष आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.
3. पाणी तुंबण्याच्या ठिकाणी उदंचन संचांची व्यवस्थाः
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी उदंचन संचांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. या ठिकाणी ‘रिफ्लेक्टीव्ह जॅकेट’ परिधान केलेल्या कामगारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर साचलेला कचरा स्वच्छ करण्यात येत आहे.
4. पूर बचाव पथके तैनातः
वेगाने वारे वाहण्याची शक्यता व पर्जन्यवृष्टीची संभाव्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 6 चौपाट्यांवर पूरबचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत. तसेच या सर्व ठिकाणी मुंबई पोलीसांच्या मोबाईल व्हॅन्स कार्यतत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व चौपाट्यांवर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
5. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क व सुसज्जः
बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज व सतर्क असून या यंत्रणेस हवामान खात्याकडून प्राप्त अंदाज व चक्रीवादळाबाबतच्या सूचना व सतर्कतेचे संदेश सर्व संबंधितांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाही देखील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे.
6. वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयांनी तयारी करावी :
वेगाने वाहणारे वारे व पर्जन्यवृष्टी संभाव्यतेच्या पार्श्वभूमीवर वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय क्षेत्रातील जनित्र व इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करुन घ्यावी. तसेच आवश्यक ती इंधन उपलब्धता देखील करवून घ्यावी, जेणेकरुन रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशाही सूचना देण्यात येत आहेत.
हेही वाचा :
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर, महाराष्ट्रात कुठे काय परिणाम?
‘निवार’ची झळ सोसत असताना तामिळनाडूवर पुन्हा संकटाचं सावट, आणखी एक भयावह चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
मुंबईत मुसळधार पावसाने इमारतीचे 2 मजले कोसळले, घरांतील माणसं धावतपळत बाहेर
व्हिडीओ पाहा :
BMC alert about Tauktae Cyclone in Mumbai for two days