सत्ता असूनही शिवसेनेच्या नाकी नऊ आणणारे अजोय मेहता राज्याचे मुख्य सचिव
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे अजोय मेहता यांच्या नियुक्तीविषयी अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण आचारसंहितेमुळे अडचणी होत्या. अखेर अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली. ते 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अजोय मेहता या अगोदर राज्यात पर्यावरण खात्याचे […]
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे अजोय मेहता यांच्या नियुक्तीविषयी अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण आचारसंहितेमुळे अडचणी होत्या. अखेर अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली. ते 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
अजोय मेहता या अगोदर राज्यात पर्यावरण खात्याचे मुख्य सचिव होते. पण यापेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशीही त्यांची ओळख आहे. मुंबई महापालिका निवडणुकांनंतर शिवसेनेचा महापौर बसला असला तरी शिवसेनेला मनासारखी मोकळीक मिळू नये याची चोख काळजी अजोय मेहता यांनी घेतली. एवढंच नाही, तर सत्ता असूनही मेहता यांनी शिवसेनेच्या नाकी नऊ आणले.
अजोय मेहता यांचे काम पाहता त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी केव्हाच वर्णी लावता यावी यासाठी तीन वेळा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र त्यात आचारसंहिता आडवी येत होती. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांसाठीचं मतदान झालं असलं तरी अजून दोन टप्प्यातलं मतदान बाकी आहे. त्यामुळे आचारसंहिता हा अडथळा होता. दुष्काळी कामांना वेग यावा यासाठी राज्यातील आचारसंहिता शिथील करण्यात आली आहे.
अखेर अजोय मेहता यांच्या बदलीचा आदेश येणार आहे. निवडणूक आयोगाकडूनच मेहतांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचे विद्यमान मुख्य सचिव यूपीएस मदान हे स्वेच्छानिवृत्ती घेणार आहेत. मदान हे यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. पण ते या पदावर कायम राहिले असते, तर मेहतांना सचिवपद कसं मिळालं असतं ही चर्चा आहे.
एक आयुक्त बदलला जातो तेव्हा त्याची परिणिती म्हणजे इतर आयुक्तांच्या बदल्यात होते, त्यामुळे आता मुंबई महापालिका आयुक्तपदी मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. असं झालंच तर अजोय मेहता हे सप्टेंबरमध्ये निवृत्त होत असल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण परदेशी यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागू शकते.