मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर पालिका कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकारच्या धर्तीवर बीएमसी कर्मचाऱ्यांनाही आता प्रत्येक शनिवार-रविवार सुट्टी मिळण्याची चिन्हं आहेत. (BMC Employees Five Days Week)
महापालिकेच्या कामगार विभागाने त्या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केलं असून त्यावर आता पालिका आयुक्तांची स्वाक्षरी होण्याची औपचारिकता बाकी आहे. या परिपत्रकानुसार अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात येणार आहे.
पाच दिवसांचा आठवडा केला जावा, अशी मागणी राज्य सरकारसोबतच निमशासकीय आणि महापालिका कर्मचाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. या मागणीनुसार राज्य सरकारने 24 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्याची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासून केली जात आहे.
आता सरकारी कार्यालये सोमवार ते शुक्रवार खुली राहणार असून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सरकारी कार्यालय बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे पालिका आयुक्तांच्या शिक्कामोर्तबानंतर बीएमसी कर्मचाऱ्यांनाही वीकेंडला सुट्टी मिळणार आहे.
हेही वाचा – ‘त्या’ विभागांना 5 दिवसांचा आठवडा नाही, शासन निर्णय जारी!
केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. आतापर्यंत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा शनिवार कार्यालयीन सुट्टी होती. पाच दिवसाच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे शासकीय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचे डिझेल, पेट्रोल या खर्चामध्ये बचत होणार आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबाला वेळ देणे शक्य होऊन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल.
प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार
आतापर्यंत कार्यालयीन वेळेमुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 288 व्हायचे. भोजनाचा 30 मिनिटांचा कालावधी वगळून प्रतिदिन 7 तास 15 मिनिटे प्रतिदिन कामाचे तास होतात. यामुळे एका महिन्यातील कामाचे तास 174 तर एका वर्षातील कामाचे तास 2088 इतके होत असत.
पाच दिवसाच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 264 होतील. मात्र, कामाचे 8 तास होतील. एका महिन्यातील कामाचे तास 176 तर वर्षातील कामाचे तास 2112 इतके होतील. म्हणजेच प्रतिदिन 45 मिनिटे, प्रतिमहिना 2 तास आणि प्रतिवर्ष 24 तास इतके कामाचे तास वाढतील.
BMC Employees Five Days Week