मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईत खड्डे की खड्ड्यात मुंबई (Mumbai Potholes) असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पावसाळ्यात पडतो. मात्र सद्यस्थितीत मुंबईत(Mumbai) केवळ 414 खड्डे शिल्लक असल्याचा अजब दावा मुंबई महापालिकेने(Mumbai BMC) केला आहे. विशेष पालिकेने याबाबतच पत्रक काढलं असून त्यावरुन विरोधी पक्षांनी पालिकेवर चांगलीच टीका केली आहे.
पावसाळा सुरु झाला की मुंबईकरांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरी जावे लागते. यावर पालिका उपाययोजना करत असली तरीही दरवर्षी मुंबईकरांना खड्ड्यांना सामोरी जावं लागतं. यंदाच्या वर्षी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यासंबंधी तक्रारींसाठी महापालिकेने MCGM 24×7 हे अॅप सुरु केले आहे.
त्यावर 10 जूनपासून आतापर्यंत 2 हजार 648 तक्रारींची नोंद झाली आहे. या तक्रारींची दखल घेत पालिकेने 2 हजार 334 खड्डे बुजवले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. म्हणजे आतापर्यंत दाखल झालेल्या जवळपास 84 टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचेही यात म्हटलं आहे.
विशेष म्हणजे मुंबईत ए वॉर्ड म्हणजे फोर्ट, कुलाबा आणि कफ परेड परिसरात अवघे पाच खड्डे शिल्लक आहेत. तर बी वॉर्ड म्हणजेच पायधुनी आणि कालबादेवी परिसरात 30 खड्डे असल्याच्या तक्रारी 10 जूनपर्यंत आल्या होत्या. त्यातील 29 खड्डे बुजवले आहेत. तर के पूर्व म्हणजेच अंधेरी पूर्व, सहार मरोळ या ठिकाणी सर्वाधिक 371 खड्डे तक्रारी असल्याचे पालिकेने या पत्रकात म्हटलं आहे.