मुंबई : मुंबई महापालिकेने मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात वरळीतील एका मालमत्ता कर धारकाला कारवाईचा बडगा दाखवण्यात आला. त्यानंतर संबंधित मालमत्ता कर धारकाने तातडीने 28 वर्षांपासून थकीत असलेला साडेतीन कोटींचा थकीत मालमत्ता कर जमा केला आहे (BMC recovered Money Rs 3.5 crore from single taxpayer).
1992 सालापासून थकबाकी
मुंबईच्या ‘जी दक्षिण’ विभाग कार्यक्षेत्रातील वरळी परिसरात ‘मे. नॅशनल कॉटन प्रॉडक्ट’ या नावाने कर निर्धारित असलेल्या 6 व्यवसायिक गाळ्यांचा मालमत्ता 1992 सालापासून थकीत होता. त्याची रक्कम 3 कोटी 61 लाख 47 हजार 38 रुपये इतकी होती. या अनुषंगाने कर निर्धारक आणि संकलक खात्याद्वारे धडक कारवाईचा बडगा दाखवण्यात आला. त्यानंतर संबंधितांद्वारे 3 कोटी 22 लाख 52 हजार 459 रुपये एवढ्या रकमेचा धनादेश महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.
बोरीवलीतही एकाचकडून 16 लाखांचा मालमत्ता कर वसूल
‘आर मध्य’ विभाग कार्यक्षेत्रातील बोरिवली (पूर्व) परिसरात असणाऱ्या कृपाधाम गृहनिर्माण संस्थेकडे मालमत्ता कराची 16 लाख 24 हजार 60 रुपये एवढी थकबाकी होती. यामध्ये 1 लाख 56 हजार 622 एवढ्या दंड रकमेचाही समावेश होता. या थकबाकीच्या अनुषंगाने जल जोडणी खंडित करण्याची कारवाई महापालिकेद्वारे करण्यात येणार होती. या प्रस्तावित कारवाईची माहिती मिळताच सदर गृहनिर्माण संस्थेद्वारे मालमत्ता कर रुपये 14 लाख 67 हजार 438 आणि थकबाकीवरील दंड रुपये 1 लाख 56 हजार 622; म्हणजेच एकूण रुपये 16 लाख 24 हजार 60 एवढ्या दंड रकमेचाही भरणा महापालिकेकडे करण्यात आला आहे.
मालमत्ता कर न भरणाऱ्यांची जल जोडणी खंडित
‘टी’ विभागाच्या हद्दीतील ‘वर्धन हॉल’ यांच्यावर रुपये 95 लाख 78 हजार 409 एवढी मालमत्ता कराची थकबाकी आहे. या अनुषंगाने वारंवार विनंती करुन आणि नोटीस पाठवून देखील मालमत्ता कराचा भरणा न करण्यात आल्याने सदर मालमत्तेची जल जोडणी खंडित करण्यात आली आहे (BMC recovered Money Rs 3.5 crore from single taxpayer).
‘एन’ विभाग हद्दीतील ‘दीप्ती सॉलिटेअर कमर्शिअल प्रॉपर्टी व श्रीपाल कॉम्प्लेक्स कमर्शिअल प्रॉपर्टी’ यांच्याकडे अनुक्रमे रुपये 17 लाख 39 हजार 536 आणि रुपये 49 लाख 22 हजार 375 एवढ्या मालमत्ता कराची थकबाकी होती. या अनुषंगाने वारंवार विनंती करुन आणि नोटीस पाठवून देखील मालमत्ता कराचा भरणा न करण्यात आल्याने सदर दोन्ही मालमत्तांची जल जोडणी खंडित करण्यात आली आहे.