कर वसुलीबाबत बीएमसी आक्रमक, थकबाकी झाल्याने कंपनीचे 2 हेलिकॉप्टर जप्त
बीएमसीने मालमत्ता कर थकवल्याने मेस्को एअरलाईन्स कंपनीची 2 हेलिकॉप्टर जप्त केले आहेत.
मुंबई : बृह्नमुंबई महानगरपालिकेचं (BMC) जकातीतून मिळणारे उत्पन्न बंद झालं आहे. उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्याने अखेर बीएमसीने कर थकबाकी सक्तीने वसूल करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून बीएमसीने थकबाकीदार मेस्को एअरलाईन्स कंपनीची 2 हेलिकॉप्टर जप्त केले आहेत (BMC seize 2 helicopter of mesco airlines). यानंतर मुंबईत बीएमसीच्या या कारवाईची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या कर उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. याच परिणाम देशातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या बृह्नमुंबई महानगरपालिकेवरही (BMC) झाला आहे. त्यामुळेच बीएमसीने कर थकबाकीवर आक्रमक भूमिका घेतली आहे.
मेस्को एअरलाइन्स कंपनीकडे 1 कोटी 64 लाख 83 हजार 658 रुपयांचा मालमत्ता कर थकलेला होता. वारंवार नोटीस देऊनही थकबाकी जमा न केल्याने अखेर बीएमसीने ‘शेड्युल के’नुसार कारवाई करत मेस्को एअरलाइन्स कंपनीचे दोन हेलिकॉप्टर जप्त केले.
बीएमसीच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले, “मुंबई महानगरपालिकेवर सध्या मोठ्या प्रकल्पांचा भार आहे. त्यासाठी पैसा लागणार आहे. त्यामुळे थकबाकीची वसूली ही करावीच लागणार आहे. त्यासाठी जप्तीच्या कारवाईचा मार्ग देखील अवलंबला जाईल.”
BMC seize 2 helicopter of mesco airlines