Mithi River : मिठी नदीचा पूर टाळण्यासाठी पालिकेची नवी आयडिया, फ्लडगेट्स बसवण्याचा निर्णय
दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणारी पूरस्थिती टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नदीत 28 फ्लडगेट्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणारी पूरस्थिती टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नदीत 28 फ्लडगेट्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 17.8 किमी लांबीची मिठी नदी (Mithi River) बोरिवली (borivali) येथील विहार तलावातून उगम पावते. बोरिवलीपासून माहीम (mahim) खाडीतून अरबी समुद्रातपर्यंत वाहते. दरवर्षी पावसाळ्यात नदीतील पाण्याची पातळी पात्राबाहेर गेल्याची पाहायला मिळते. त्यामुळे सायन, चुनाभट्टी, कुर्ला आणि घाटकोपर सारख्या सखल भागात पूरस्थिती निर्माण होते. मागच्या पाच वर्षांपासून या भागात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणे हे कायमचेच झाले आहे. पावसाळ्यात मिठी नदीच्या पूरामुळे रेल्वे वाहतूक देखीव विस्कळीत होते.
पूराचे पाणी थांबण्यास मदत होईल
नदीत 28 हे फ्लडगेट्स बसवल्याने ओव्हरफ्लो होणारे पाणी रहिवासी भागात आणि रेल्वे रुळांमध्ये जाण्यापासून थांबण्यास मदत होईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हे फ्लडगेट्स माहीम खाडीपासून सुरू होणाऱ्या भरती-ओहोटीच्या झोनमध्ये बसवले जातील आणि खाडीपासून उपनगरी मुंबईच्या आत 8 किलोमीटर खोलवर जातील असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. “मिठी नदी अरुंद आहे आणि आमच्याकडे पारंपारिक पंपिंग स्टेशनसह क्षैतिज फ्लडगेट्स उभारण्यासाठी पुरेशी जागा नाही. म्हणून, आम्ही कमी जागा वापरतील आणि उद्देश पूर्ण करतील असे उभे दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे असल्याचे वेलरासू अधिकाऱ्यांनी सागितले आहे.
भरती-ओहोटीच्यावेळी फ्लडगेट्सचा वापर होईल
पावसाळ्यात भरती-ओहोटीच्या वेळी, हे गेट्स तैनात केले जातील जेणेकरून जास्त पाणी आणि नाल्यातील पाणी बाहेर काढता येईल. या फ्लडगेट्सची स्थापना पावसाळ्यात पुरासाठी करण्यात आली आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि जर्मनीच्या तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या गेट्सच्या उभारणीसाठी आणि देखभालीसाठी स्वारस्य दाखवले आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण त्यांनी पालिकेला तांत्रिकदृष्ट्या दाखवले आहे अशी माहिती वेलरासू यांनी दिली. यासाठी कंत्राटदारांची अंतिम नियुक्ती योग्य टेंडरिंगद्वारे केली जाईल आणि येत्या 15 दिवसांत या प्रकल्पाच्या निविदा काढल्या जातील. पालिकेने या प्रकल्पासाठी ₹1,600 कोटी अंदाजपत्रकाचा अंदाज वर्तवला आहे. या प्रकल्पातील प्राथमिक आव्हानांपैकी एक म्हणजे नदीच्या काठावर झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करावी लागेल.