मुंबईत ‘मावळा’ खोदतोय महाबोगदा; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील

| Updated on: Jan 11, 2021 | 2:00 PM

मुंबईत कोस्टल रोडच्या निर्मितीचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे. (BMC unveils country's biggest mavala machine for Coastal Road Project)

मुंबईत मावळा खोदतोय महाबोगदा; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील
Follow us on

मुंबई: मुंबईत कोस्टल रोडच्या निर्मितीचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या मार्गातील दोन महाबोगदे खोदण्याचं काम आजपासून सुरू झालं असून ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीनने हे दोन महाबोगदे खोदले जाणार आहेत. या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हिरवा कंदील दाखवला. (BMC unveils country’s biggest mavala machine for Coastal Road Project)

कोस्टल रोडच्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘मावळा’ या अजस्त्र बोरिंग मशिनचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रियदर्शिनी पार्क येथे करण्यात आला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 2013 मध्ये कोस्टल रोड बांधण्याची कल्पना सुचली होती. त्यानंतर कोस्टल रोडच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला. या कामासाठी 12 हजार 721 कोटी रुपये करण्यात येणार आहेत. पालिकेच्या फंजिबल एफएसआयमधून ही रक्कम खर्च केली जात आहे. या कामासाठी आतापर्यंत 1281 कोटी रुपये खर्च झाले आहेत. कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा एकूण 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे. याचा पहिला टप्पा प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते वरळी सी लिंक असा आहे.

चौपाटीखालून महाबोगदे

कोस्टल रोडचा मार्ग गिरगाव चौपाटीखालून म्हणजे समुद्राखालून जाणार आहे. चौपाटीखाली दोन महाबोगदे तयार करण्यात येणार आहे. अरबी समुद्राखालील तब्बल 175 एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून 102 एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या मार्गावर समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असतील. हे काम मावळा मशीनद्वारे (टीबीएम) करण्यात येणार आहे. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला. एक बटन दाबताच ही मावळा मशीन जमिनीच्या आत खंदक खोदायला सुरुवात करेल. समुद्राखाली सुरू असलेल्या या भुयारी मार्गाच्या कामाची मुंबईकरांना कल्पनाही येणार नाही आणि मुंबईकरांना या कामाचा त्रासही होणार नाही.

असा आहे मावळा

प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत 2.082 किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार आहे. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी मावळा टनेल बोअरिंग मशीन वापरली जाणार आहे. या मशीनचा व्यास 39.6 फूट इतका आहे. मशीनची लांबी 400 मीटर आहेत. ही मशीन चीनमधून आणण्यात आली आहे. हे भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचा टीबीएम मशीन आहे. बोगद्याचा तयार केलेला व्यास 11 मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. या टीबीएम मशीनला मावळा असं नाव देण्यात आलं आहे. (BMC unveils country’s biggest mavala machine for Coastal Road Project)

पालिकेचे अधिकारी-कर्मचारीही मावळेच: मुख्यमंत्री

महाबोगदा तयार करण्याचं काम मुंबई महापालिकेने हाती घेतलं आहे. एवढं मोठं काम हाती घेणारी मुंबई महापालिका एकमेव पालिका आहे. हे बोगदे खोदण्यासाठी मावळा आणला आहे. जगातील सर्वात मोठी मशीन आहे ही. या मशीनद्वारे दोन बोगदे खोदले जातील. ऑगस्टपर्यंत एका बोगद्याचं काम पूर्ण होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोरोना काळातही कोस्टलरोडचं काम सुरू होतं. ठरलेल्या वेळेतच काम पूर्ण होईल. पालिका पदाधिकारी-कर्मचारी हे काम करत आहेत. हे सर्व मावळेच आहेत, असंही ते म्हणाले.

कोस्टल रोडची वैशिष्ट्य

>> साडे सहा किलोमीटरचे बोगदे
>> आठ लेनचा मार्ग, मार्गावर ४ इंटरचेंज
>> सिग्नल फ्री मार्ग
>> 34 % इंधन बचत होणार
>> 1650 वाहन पार्किंगची सोय
>> 4 दशलक्ष मेट्रिक टनच मटेरियल वापरणार
>> माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार
>> 4 वर्षाचा कालावधी
>> 90 हेक्टर ओपन जागा, 26 हजार कोटींची जागा उपलब्ध होणार
>> पुरामध्ये देखील हा मार्ग वापरता येणार (BMC unveils country’s biggest mavala machine for Coastal Road Project)

 

संबंधित बातम्या:

शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल, केवळ रस्ताच बांधण्याची अट

खास ‘मावळा’ समुद्राखाली 400 मीटरचे बोगदे खोदणार, मुंबईच्या समुद्रात काम नेमकं कसं चालणार?

(BMC unveils country’s biggest mavala machine for Coastal Road Project)