सैफ अली खानवरील हल्ल्याला धार्मिक रंग? जितेंद्र आव्हाड यांची संशयाची सुई कुणावर, केला हा गंभीर आरोप
Jitendra Avhad on Saif Ali Khan Attack : सलमान खान, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर मुंबई पुन्हा हादरली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता विरोधकांनी सरकारला घेरले आहे. या हल्ल्याला धार्मिक रंग तर नाही ना? अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
व्हीआयपींवरील हल्ल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई हादरली. सलमान खान, बाबा सिद्दीकी आणि आता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरले आहे. या हल्ल्याला धार्मिक रंग तर नाही ना? अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने वार करण्यात आले ते पाहता, यामागे धार्मिक कट्टरता असलेला व्यक्ती तर नाही ना? अशी शंका आव्हाड यांनी व्यक्त केली. त्यांनी एकूणच या सर्व प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट केले आहे.
कायदा-व्यवस्थेचे धिंडवडे निघाले
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेवर चांगलेच तोंडसुख घेतले. जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, जिथे हाय प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात, असा सवाल त्यांनी ट्वीटमध्ये विचारला आहे. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्वतःला विचारायला नको का? असा टोला त्यांनी लगावला.
ही अतिशय भयानक घटना
अभिनेता पद्मश्री सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ला अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो. अशाप्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही, असे आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव *#तैमुर* ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे… pic.twitter.com/9atYhziAtl
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 16, 2025
गुन्हेगारांची पाठ थोपटतंय तरी कोण?
कायद्याचे पालन करणारे राज्य म्हणून आपण नेहमीच अभिमानानं महाराष्ट्राकडे पाहत आलो. पण आता परिस्थिती खरोखरंच हाताबाहेर जात चालली आहे. कोणाचं पाठबळ मिळतंय यांना की, कायद्याचा जरा ही धाक राहिलेला नाही? महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे, अशी टीका आव्हाडांनी केली.
गृहमंत्री करतायेत तरी काय?
वाढत्या गोळीबाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणं आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणं, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचं राजकारण वाढणं या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती नाहीशी झाली आहे, अशी तिखट प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली. सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. राज्याचे गृहमंत्री करताहेत तरी काय? असा सवाल त्यांनी विचारला.
गुन्हे शाखेच्या 15 टीमकडून तपास
दरम्यान सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीम स्थापना करण्यात आल्या आहेत. तर मुंबई पोलिसांच्या 7 टीम कार्यरत आहेत. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकूण 15 टीम तपास करत आहेत.