बोरिवली सर्वाधिक गर्दीचं स्टेशन, दररोज 3 लाखांपेक्षा अधिक प्रवासी
मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली स्थानक सर्वाधिक गर्दीचे असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. बोरिवली स्थानकावर दररोज 3 लाख 5 हजार 670 प्रवाशी प्रवास करतात.
मुंबई : मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली स्थानक सर्वाधिक गर्दीचे असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. बोरिवली स्थानकावर दररोज 3 लाख 5 हजार 670 प्रवाशी प्रवास करतात. या स्थानकावर दररोज प्रवासी संख्या 2017-18 मध्ये 2 लाख 93 हजार 222 होती. ती आता 2018-19 मध्ये 3 लाख 5 हजार 670 इतकी वाढली आहे. पश्चिम रेल्वेवर सर्वाधिक गर्दीचे स्थानक आणि 2018-19 मध्ये तीन लाखांच्या पुढे प्रवासी संख्या गेलेले बोरिवली स्थानक पहिले ठरले आहे.
बोरिवलीनंतर पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वाधिक गर्दी असलेले दुसरे स्थानक अंधेरी ठरले आहे. अंधेरी येथे दररोज प्रवाशांची संख्या 2 लाख 54 हजार 961 इतकी आहे. शहरात घरं परवडत नसल्याने प्रत्येकवर्षी मोठ्या प्रमाणात मुंबईकर हा मुंबई उपनगरात स्थलांतरीत होत आहे. मात्र अंधेरीच्या पूढेही बोरिवलीपर्यंत घरांचे भाव वाढले असल्यामुळे आता विरारपर्यंत मुंबईकर गेला आहे. खिशाला परवडतील अशी घरं सध्या मुंबईकरांना विरार येथे मिळत आहेत. यामुळे विरारवरुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसत आहे.
उत्पन्नात वाढ
प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. 2017-18 मध्ये पश्चिम रेल्वेवर 23 लाख 77 हजार 820 रुपये उत्पन्न मिळत होते. ते आता 2018-19 मध्ये 24 लाख 639 वर इतके वाढले आहे.
प्रवाशी संख्येत वाढ
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2017-18 मध्ये 35 लाख 57 हजार 366 एवढी प्रवासी संख्या होती. ही संख्या 2018-19 मध्ये 35 लाख 88 हजार इतकी वाढली आहे.
या स्थानकावरील प्रवासी संख्येत घट
स्थानक | प्रवासी (2017-18) | प्रवासी (2018-19) |
---|---|---|
मरीन लाइन्स | 39,793 | 38,641 |
चर्नी रोड | 52,054 | 51,855 |
ग्रॅण्टरोड | 78,215 | 77,345 |
महालक्ष्मी | 42,290 | 41,274 |
लोअर परळ | 67,015 | 65,734 |
प्रभादेवी | 77,243 | 72,486 |
वांद्रे | 1,42,184 | 1,40,765 |
सांताक्रुझ | 1,42,195 | 1,39,908 |