Brij Bhushan Singh : होय माझे संबंध आहेत, मला गर्व, मनसेच्या ‘शरद पवार’ ट्विटवर बृजभूषणसिहांचे सडेतोड बोल
पहिल्यांदा ते मला माळा घालायचे, त्यांनी एकही सत्काराचा हार स्वत: घातला नाही, सर्व मला घातले. कारण पवारांना असं वाटतं की, कुस्तीच्या क्षेत्रात, जे काम झालं ते माझ्यामुळे झालं. सुशीलकुमारचं ऑलंपिक मेडल असो की योगेश्वर दत्तचं त्यात आमचा वाटा आहे.
मनसेच्या प्रवक्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सापळ्याचे थेट आरोप केल्यानंतर बृजभूषणसिंह (Brij Bhushan Singh) यांनी सडेतोड भूमिका घेतलीय. होय, माझे शरद पवारांसोबत चांगले संबंध आहेत आणि ते आता भेटले तर नजर झुकवून नाही तर आदरानं त्यांना प्रणाम करणार असं बृजभूषणसिंह म्हणालेत. tv9 मराठीशी (tv9 Marathi) बातचीत करताना त्यांनी ही भूमिका जगजाहीर केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला. हिंदुत्वासाठी त्यांना तो दौरा महत्वाचा वाटतो. पण त्या दौऱ्याला भाजपचे स्थानिक खासदार बृजभूषणसिंह यांनी विरोध केला. आधी उत्तर भारतीयांची माफी मागा अन् नंतरच अयोध्येत पाऊल ठेवा अशी भूमिका घेतली. शेवटी राज ठाकरेंनाच चार कारणे देत दौराच रद्द करावा लागला. आणि ह्या सगळ्याच्या मागे एक षडयंत्र आहे, सापळा आहे असा संशयही राज ठाकरेंनी पु्ण्यातल्या सभेत व्यक्त केला. त्यानंतर ह्या षडयंत्राच्या मागे आहे कोण याची राजकीय चर्चा महाराष्ट्रात रंगलीय. खुद्द राज ठाकरेंनी याला भाजपाचे नेते जबाबदार असल्याचे संकेत दिले पण त्यांच्या प्रवक्त्यांनी आज मात्र शरद पवारांना टार्गेट केलंय. त्यावर बृजभूषणसिंहांची भूमिका आता महत्वाची ठरतेय.
काय म्हणाले बृजभूषणसिंह ?
मनसेच्या प्रवक्त्यांनी शरद पवार-बृजभूषणसिंह आणि सुप्रिया सुळे मावळमधल्या कार्यक्रमात एकत्र असल्याचा फोटो ट्विट केलाय. त्यात ह्या ब्रिजचे निर्माते शरद पवार असल्याचा आरोप मनसेनं केलाय. कदाचित त्यांना वाटलं असावं की यामुळे बृजभूषणसिंह हे बॅकफुटवर जातील. पण घडलंय नेमकं उलटं. बृजभूषणसिंह म्हणाले-शरद पवार देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. मी कुस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि पवार हे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे संरक्षक आहेत. हा कार्यक्रम तीन वर्षापूर्वी पुण्यात झाला होता. तेव्हा तीन दिवस, शरद पवार, सुप्रिया सुळे कमीत कमी तीन दिवसांची वेळ द्यायचे, आणि मला याचा गर्व आहे की, कुठलाही कार्यक्रम असो, पहिल्यांदा ते मला माळा घालायचे, त्यांनी एकही सत्काराचा हार स्वत: घातला नाही, सर्व मला घातले. कारण पवारांना असं वाटतं की, कुस्तीच्या क्षेत्रात, जे काम झालं ते माझ्यामुळे झालं. सुशीलकुमारचं ऑलंपिक मेडल असो की योगेश्वर दत्तचं त्यात आमचा वाटा आहे. साक्षीचं मेडल आलं त्यातही माझं नाव घेतलं जातं.
माझे संबंध, मला गर्व
बृजभूषणसिंह पुढं म्हणाले, होय, माझे संबंध आहेत (शरद पवारांसोबत) आणि मला याचा गर्व आहे. आजही शरद पवार भेटले तर मी नजर नाही चोरणार. मी त्यांना प्रणाम करणार. ते माझ्यासाठी एक चांगले नेते आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरेंनी शिकलं पाहिजे.
मनसेनं कोणते फोटो ट्विट केलेत?
गजानन काळेंनी तीन फोटो ट्विट केलेत. ह्या तीनही फोटोत बृजभूषणसिंह यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार दिसतायत. मावळमधल्या एका कुस्तीच्या कार्यक्रमातले हे फोटो आहेत. ते नेमके कधीचे आहेत हे स्पष्ट होत नाही. पण तीनही फोटोत एक समानता म्हणजे बृजभूषण यांच्यासोबत पवार, सुप्रियांचा फोटो. त्यावर गजानन काळेंनी “ब्रिज” चेनिर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे …( फोटो झूम करून पाहावा…) असं लिहिलं आहे. काळेंच्या सुचनेनुसार फोटो झूम करुन पाहिला तरी बृजभूषण आणि पवार हेच दिसतात. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्याविरोधात सापळा ‘ब्रिज’ चा सापळा रचणारे शरद पवारच असल्याचा आरोप काळेंनी केलाय.
“ब्रिज” चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे …
( फोटो झूम करून पाहावा…) pic.twitter.com/oYQZnMbM7Y
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 24, 2022
राज ठाकरे काय म्हणाले होते?
पुण्यात मी अयोध्येला जाणार असल्याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मी पाहत होतो. काय चाललं नेमकं. मला मुंबईतून माहिती मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. नेमकं काय चाललंय. हा सगळा ट्रॅप आहे. या सापळ्यात आपण आडकून पडू नये. म्हणून अयोध्येला जायचं नव्हतं या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. मी हट्टाने अयोध्येला गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक, हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असंत. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही