मुंबईः महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा तसेच कुशल मनुष्यबळ असल्याने येथे गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध असून इंग्लंडमधील उद्योजकांनी येथे गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स इलिस (British High Commissioner Alex Ellis) यांच्यासमवेत चर्चेदरम्यान करण्यात आले. भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स इलिस यांनी शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट (Ministry visit) घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी चर्चा करताना अलेक्स इलिस म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तांतर म्हणजे बॉलीवूडची पटकथा आहे, आणि त्याचे हिरो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ब्रिटनच्या मुंबईतील उपउच्चायुक्त कॅथरिन बार्न्स, उपउच्चायुक्तांचे सल्लागार सचिन निकार्गे तसेच राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उपस्थित होते.
#ब्रिटन चे भारतातील उच्चायुक्त @AlexWEllis यांनी मुख्यमंत्री @mieknathshinde यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/FikeBcxK9K
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 5, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राज्यात सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी उपक्रमांबाबत ब्रिटीश उच्चायुक्तांना माहिती दिली.
जागतिक दर्जाच्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वास आले असून यामुळे विदर्भातील औद्योगिकीकरणास मोठी चालना मिळणार आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्प, बंगळुरू-मुंबई कॉरिडॉर, कोस्टल रोड, गोवा महामार्ग असे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. याचबरोबर 28 टक्क्यांसह महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील आघाडीचे राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.
I was delighted to meet Honourable @cmomaharashtra Eknath Shinde and to discuss ways to strengthen further the UK/Maharashtra partnership. pic.twitter.com/4gY4jxPztA
— Alex Ellis (@AlexWEllis) August 5, 2022
महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आदींची उपलब्धता आहे. देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. येथे गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना राज्य शासन सर्व ते सहकार्य करणार आहे असे सांगून महाराष्ट्र आणि इंग्लंडमधील घनिष्ट संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. अलेक्स इलिस यांनी ब्रिटीश शासनाच्यावतीने व्यापार, गुंतवणूक आदींमधील संधींबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
इलिस ‘वडापाव’चे चाहते
ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स इलिस यांना मुंबईचा वडापाव आवडत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या आदरातिथ्यामध्ये वडापावचा आवर्जुन समावेश करण्यात आला. वडापावचा अतिशय आनंदाने आस्वाद घेताना इलिस यांनी इंग्लंडमध्येही वडापाव आता लोकप्रिय होत असल्याचा उल्लेख केला.
अलेक्स यांनी हिंदीतून संवाद साधत मुख्यमंत्री शिंदे यांना सुखद धक्का दिला. इंग्लंड आणि महाराष्ट्र राज्याचे शैक्षणिक संबंध वेगाने दृढ होत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. सध्या इंग्लंडचे 20 संशोधन प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
‘महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाले त्याच्यावर माझे लक्ष होते. एखाद्या बॉलीवूड चित्रपटाचे पटकथा असावी असा तो सत्तांतराचा खेळ रंगत गेला आणि आपण त्याचे हिरो होतात,’ असे उच्चायुक्त इलिस यांनी सांगताच मुख्यमंत्री शिंदे यांनी अतिशय अदबीने, आपण केवळ सामान्य आणि सतत काम करणारा माणूस असल्याचे सांगितले.