धक्कादायक..! साडेतीन वर्षाच्या मुलाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला; वडिलांनी हत्या करून मृतदेह पुराल्याचा संशय
निकेश वाघ यांच्या वडिलांनी 28 जुलै रोजी झोपडीच्या बाजूलाच आपल्या मुलाची हत्या करून हा मृतदेह पुराला असल्याचा संशय स्थानिकांनी वर्तविल्या होता. त्यानंतर ही घटना उघडकीला आली आहे. मात्र मुलाचे आजी आजोबांनी मात्र मुलगा आजारी होता त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.
विरार: विरारमध्ये साडेतीन वर्षाच्या मुलाचा पुरलेला मृतदेह (dead body) आज शनिवारी बाहेर काढून शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आल्याची घटना घडली आहे. वडिलांनीच मुलाची हत्या करून, त्याचा मृतदेह झोपडीच्या बाजूला पुराला असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला होता. विरार पोलिसांना (Virar Police) घटनेची माहिती सजल्यानंतर आज प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास पुरलेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढून जेजे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी (Postmortem) पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करुन मुलाचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मुलाचा मृतदेह झोपडीजवळच पुराला असल्याने हा नरबळीचा प्रकार आहे की काय असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
कुटुंब मोलमजुरी करणारे
या प्रकरणातील ज्या लहान मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, त्याचे नाव निकेश वाघ असे आहे. तो साडेतीन वर्षाचा होता. तर गणेश वाघ (वय 25) असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. विरार पूर्व जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी एका झोपडीत वाघ कुटुंबीय राहत आहे. मोलमजुरी व मंदिराजवळ भीक मागून आपली गुजराण करतात असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
हत्या केल्याचा संशय?
निकेश वाघ यांच्या वडिलांनी 28 जुलै रोजी झोपडीच्या बाजूलाच आपल्या मुलाची हत्या करून हा मृतदेह पुराला असल्याचा संशय स्थानिकांनी वर्तविल्या होता. त्यानंतर ही घटना उघडकीला आली आहे. मात्र मुलाचे आजी आजोबांनी मात्र मुलगा आजारी होता त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर कारण समजणार…
मृतदेह संशयास्पद पुराला असल्याची आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून, मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. यामध्ये नरबळीसारखा कोणताही प्रकार नाही, पण ही हत्या आहे की आजाराने मृत्यू झाला आहे हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही कारवाही करणार असल्याचे विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले.