आता महापालीकेच्या शाळेत ‘जय श्रीराम’; मंगलप्रभात लोढा यांचे पालिका आयुक्तांना आदेश काय?

| Updated on: Dec 15, 2023 | 8:39 PM

अयोध्यानगरी येत्या 22 जानेवारीला जय श्री रामाच्या घोषाने दुमदुमणार आहे. अयोध्येत या दिवशी श्रीराम लला विराजमान होणार आहेत. भव्य दिव्य अशा प्रभू श्री राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पालिका शाळातही आता प्रभू श्रीरामाचा जयघोष होणार आहे.

आता महापालीकेच्या शाळेत जय श्रीराम; मंगलप्रभात लोढा यांचे पालिका आयुक्तांना आदेश काय?
mcgm
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 15 डिसेंबर 2023 : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. भारतीय संस्कृतीत प्रभू श्री रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम मानले जाते. प्रभू श्रीराम आदर्श पूत्र होते. रामाने आपल्या आई-वडीलांच्या प्रत्येक इच्छांचे सदैव पालन केले. तर अशा सर्वार्थाने आदर्श अशा प्रभू श्री राम यांच्या व्यक्तीमत्वाची माहीती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून मुंबई महानगर पालिकांच्या शाळांमधून 1 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान ‘निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात यावी असे निर्देश कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका शिक्षण विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे भावी पिढीला प्रभू श्री रामांच्या आदर्श व्यक्तीमत्वाबद्दल आणि प्रशासन कौशल्याबद्दल मार्गदर्शन मिळण्यास मदत मिळणार आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामजन्मभूमीत रामलला विराजमान होणार आहेत. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून देशविदेशातील महनीय व्यक्तींना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. प्रभू रामाचा आदर्श विद्यार्थ्यांच्या बालमनावर बिंबविण्यासाठी आता मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवीन संकल्पना आणली आहे. प्रभू रामाची प्रतिष्ठापना नवीन वर्षांत 22 जानेवारीला अयोध्येत होणार आहे. प्रभू श्री राम हे सर्व समाजासाठी एक आदर्श आहेत. श्रीराम आदर्श पुत्र होते. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा दिली जाते. श्रीराम एकपत्‍नीव्रत आणि राजधर्माचे पालन करणारे तत्पर आदर्श राजा होते. श्रीराम हे उत्तम प्रशासक होते. अजूनही चांगल्या सुशासनाला उपमा देताना ‘राम राज्य’ असे म्हटले जाते.

 मंगलप्रभात लोढा यांची योजना

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम कौशल्य विकास विभागाच्यावतीने राबवत असतात. मुंबई महानगर पालिकेच्या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची माहिती व्हावी म्हणून मनपा शाळांमध्ये कौशल्य केंद्र सुरु करणे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु करणे यासारखे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. महानगर पालिकेच्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास शिबीरं घेणे. तसेच अभ्यासात ChatGTP चा उपयोग यासारखे मार्गदर्शनाचे कार्यक्रम त्यांनी राबविले आहेत. एक नागरिक म्हणून विकसित होताना प्रभू श्री रामाचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे असावा, त्यांच्या आदर्शाचा विध्यार्थ्यांच्या जीवनात उपयोग व्हावा म्हणून अशा स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. त्याबाबतचे पत्र त्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त आणि शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.