शिवडीत बस स्टॉपवर उभ्या असलेल्या 6 जणांना कारने उडवले, एकाचा मृत्यू
शिवडी येथे एका कारने सहा जणांना उडविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत सहाजण जखमी असून एकाची परिस्थिती गंभीर आहे.
मुंबई : शिवडी येथे एका कारने सहा जणांना उडविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत सहाजण जखमी असून एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. शाहबाज इलियास वाडी (26) असं आरोपीचे नाव आहे.
शिवडी येथील बस स्टॉपजवळ सहाजण उभे होते. यावेळी अर्टिगा कार अचानक बस स्टॉपवर उभ्या असलेल्या सहा जणांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये पाचजण जखमी असून एकाचा मृत्यू झालेला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. दर्पण दिपक पाटील (18), असं मृत मुलाचे नाव आहे. इतर पाचजण जखमी असून त्यांच्यावर परळच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कल्पेश प्रकाश घारसे (25), स्वाती दिपक पाटील (40), निधी दिपक पाटील (12), गौरी महेश नांदावकर (40), जय महेश नांदावकर, अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे म्हटलं जात आहे.
जखमींवर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस अपघाताची अधिक चौकशी करत आहेत.