Sanjay Pandey : संजय पांडेंच्या अडचणी वाढल्या, ईडीच्या कारवाईनंतर आता सीबीआयकडून FIR, फोन टॅपिंग प्रकरण भोवलं
पांडे आणि रामकृष्ण यांच्याशिवाय सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) माजी सीईओ आणि एमडी रवी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच CBI ने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्याविरुद्ध शेअर बाजारातील (Share Market) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयची ही कारवाई करण्यात आली आहे. पांडे आणि रामकृष्ण यांच्याशिवाय सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) माजी सीईओ आणि एमडी रवी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले नारायण आणि रामकृष्ण यांच्याकडूनही आणखी काही माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.
सीबीआयची अनेक ठिकाणी छापेमारी
CBI अधिकाऱ्यांनी सांगितले की CBI दिल्ली-NCR, मुंबई, पुणे, कोटा, लखनौ, चंदीगड आणि इतर शहरांमध्ये 20 ठिकाणी छापे टाकत आहे आणि माजी आयुक्त पांडे यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ही कारवाई सुरू आहे. 2009 ते 2017 या कालावधीत NSE कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे इसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडने टॅप केल्याचा आरोप आहे,यात इतर काही कंपन्यांसह NSE चे सुरक्षा ऑडिट केले होते, असेही CBI ने सांगितले. ज्या वेळी को-लोकेशन घोटाळा कथितरित्या घडला त्या वेळी कंपनीने हे ऑडिट केले होते.
संजय पांडे यांची ईडी चौकशी
त्याच वेळी संजय पांडे मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात मंगळवारी 5 जुलै रोजी ईडीसमोर हजर झाले होते. त्यांना ईडीने 3 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावले होते. आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी संजय पांडे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाले.
कंपनीचा इतिहास काय?
मार्च 2001 मध्ये संजय पांडे यांनी कंपनीची स्थापना केली आणि मे 2006 मध्ये त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला. यानंतर कंपनीचा कारभार त्यांच्या मुलाने आणि आईने बघितला. आयआयटी-कानपूर आणि हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या पांडे यांनी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर कंपनीची स्थापना केली होती. मात्र राज्य सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही आणि ते पुन्हा सेवेत रुजू झाले. मात्र त्याची लगेच कुठेही नियुक्ती झाली नाही. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबईचे पोलिस आयुक्त होते. त्यामुळे आता हे प्रकरण जास्त चर्चेत आले आहे.