मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकरणावर युक्तिवाद सुरु होता. अखेर या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय जाहीर केलाय. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिला आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. निवडणूक आयोगाने निकालामध्ये एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह म्हणून धनुष्यबाण मिळणार असल्याचं सांगितलं आहे. ठाकरे गटाला आता एक नवीन सुरुवात करावी लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय. या राजकीय घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
लोकशाहीचा हा विजय आहे. हा घटनेचा विजय आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे. त्यांचा संकल्प आणि विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो”, अशी पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिली. “लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असतं. आज सत्याचा विजय आहे. शिवसेनेने जो संघर्ष केला त्याचा हा विजय आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, हे अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने सरकार बनवलं त्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाफ झाला हा वापर कुठपर्यंत झाला आहे. हे स्पष्ट होत आहे. हा खोक्यांचा विजय आहे. सत्याचा विजय नाही. श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळाला, सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असा केला पाहिजेजो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजारबुनगे विकत घेतात. त्यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे.