मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी, आज मुंबईचा विकास नीती आयोग करणार, या मुद्यावरुन भाजपावर आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई गिळण्याचा हा अत्यंत भयंकर असा डाव आहे, असं संजय राऊत म्हणाले. “नीती आयोग मुंबईचा विकास करणार याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला गुलाम बनवून ठेवायच आहे. मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकारला ताकत द्यायची नाही. मुंबईच्या विकासाची जबाबजारी महापालिका, महाराष्ट्र सरकारची आहे. हे जाणूनबुजून होत आहे. तुम्ही पराभवाच्या भीतीने महापालिका निवडणूक घेत नाहीय” असं संजय राऊत म्हणाले.
“मुंबईला केंद्रशासित प्रदेश करणं, मुंबईला कमजोर करणं, मुंबईवर महाराष्ट्राचा अधिकार राहू नये, म्हणून निती आयोग विकास करणार हा नवीन फंडा आहे” असं संजय राऊत म्हणाले. “काय गरज आहे? महाराष्ट्र कमजोर आहे का? महाराष्ट्र मुंबईचा बाप आहे” असं राऊत म्हणाले. “तुम्हाला मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं आहे. महाराष्ट्रात कमजोर मुख्यमंत्री बसवला आहे. केंद्राला मुंबईवर कब्जा करायचा आहे. म्हणून शिवसेना फोडली, जी मुंबईची संरक्षक होती. मुंबई मराठी माणसाची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती मुंबईच्या रक्षणासाठी केलीय. आम्ही ते काम करु” असं संजय राऊत म्हणाले.
‘ अशी मुंबई कमजोर केली’
“मुंबईवर महाराष्ट्राचं नियंत्रण राहू नये. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये यासाठी किमान दहा वर्ष हे मोदी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली. मुंबईतील व्यवसायांची आंतरराष्ट्रीय कार्यालय गुजरातमध्ये खेचून नेली. मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळल्या” असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना सोडणं म्हणजे आईला विकण्यासारखं
संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी, त्यांना पक्ष सोडण्यासाठी ऑफर आली होती, असा दावा केला. त्यावर संजय राऊत यांना विचारल असता ते म्हणाले की, “आमच्यासह अनेकांना ऑफर आल्या. दबाव, प्रेशर होता. पण आम्ही फुटलो नाही, तुरुंगात गेलो. आम्हाला फोन आले, दिल्लीहून दबाव आला. पण आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत. शिवसेनेसोबतच्या निष्ठा विकणं म्हणजे आईला विकण्यासारखं आहे. शिवसेना सोडून गेलेल्यांना 2024 मध्ये पश्चाताप होईल” असं संजय राऊत म्हणाले.