मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, लोकलचे नवीन वेळापत्रक जारी
मध्य रेल्वेने नुकतंच एक नवीन वेळापत्रक जारी केले आहे. यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण काही अंशी कमी होणार आहे.
Central Railway Big Update : मुंबईची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकलला ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यात उशिरा येणाऱ्या ट्रेन, मर्यादित लोकल, लोकल डब्ब्यांची संख्या आणि सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा सतत खोळंबा होतो. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी काहीशी परिस्थिती मध्य रेल्वेची झाली आहे. मात्र आता मध्य रेल्वेने यावर एक उपाय शोधला आहे. मध्य रेल्वेने नुकतंच एक नवीन वेळापत्रक जारी केले आहे. यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण काही अंशी कमी होणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार अनेक लोकल सेवांच्या वेळेत बदल केला आहे. सीएसएमटी – कसारा लोकल दररोज रात्री 12.14 वाजता, तर सीएसएमटी – कर्जत लोकल दररोज रात्री 12.24 वाजता सुटते. पण येत्या 5 ऑक्टोबरपासून सीएसएमटी – कसारा लोकल रात्री 12.08 वाजता, तर सीएसएमटी – कर्जत लोकल रात्री 12.12 वाजता सोडण्यात येणार आहे. या दोन्हीही लोकल 6 ते 12 मिनिटे लवकर सुटणार आहेत.
तसेच मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील 24 अप आणि डाऊन लोकल फेऱ्या परळपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. तर सीएसएमटी – ठाणे चालवण्यात येणाऱ्या 6 अप आणि डाऊन लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी येथील गर्दी कमी व्हावी, यासाठी 22 अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या दादरपर्यंत चालवण्यात येणार आहे. या लोकल दादरवरुन डाऊन दिशेला रवाना होतील.
गर्दीच्या वेळी जलद लोकलला कळवा, मुंब्र्यात थांबा
त्यानंतर दादर येथील नवीन फलाट क्रमांक 11 वरून या लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या वेळी जलद लोकलला कळवा, मुंब्रा या ठिकाणीही थांबा देण्यात आला आहे. तसेच गर्दीच्या वेळी सकाळी 8.56 वाजता कळवा येथे आणि सकाळी 9.23 वाजता मुंब्रा येथे जलद लोकल थांबेल. तर, गर्दीच्या वेळी सायंकाळी 7.29 वाजता कळवा आणि सायंकाळी 7.47 वाजता मुंब्रा येथे जलद लोकलचे अतिरिक्त थांबे निश्चित केले आहेत. सकाळी 6.03 च्या कुर्ला-कल्याण लोकलचे वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून ही लोकल सकाळी 6.05 वाजता कुर्ला येथून सुटेल आणि कल्याण येथे सकाळी 7.04 वाजता पोहचेल.
सकाळी 6.03 च्या कुर्ला-कल्याण लोकलचे वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून ही लोकल सकाळी 6.05 वाजता कुर्ला येथून सुटेल आणि कल्याण येथे सकाळी 7.04 वाजता पोहचेल.