मुंबई, दि. 8 जानेवारी 2024 | मध्य रेल्वेने ‘शून्य मृत्यू’ मोहीम हाती घेतली आहे. याद्वारे रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू रोखणे हा उद्देश आहे. यासाठी मध्य रेल्वेने मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील संस्थांशी पत्रव्यवहार करून कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती केली आहे. गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेने ७५० संस्थांशी पत्रव्यवहार केला असून २७ संस्थांनी या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे लोकलमधील गर्दी कमी होऊ लागली आहे.
लोकलचा प्रवास वेगवान आणि स्वस्तात होत असल्याने सर्व अडचणी आणि धोक्यांना सामोरे जाऊन प्रवासी प्रवास करतात. गर्दीमुळे लटकून काही जण प्रवास करतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांचा रेल्वे अपघाती मृत्यू होतो. गेल्या नऊ वर्षात रेल्वे रूळ ओलांडून ७,८३१ प्रवाशांचा मृत्यू झाला. लोकलमधून पडून ३,४८५ प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीमय प्रवासात रेल्वे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे यावेळेतील रेल्वे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ‘शून्य मृत्यू’ मोहीम हाती घेतली आहे. नोव्हेंबर २०२३ पासून मुंबईतील संस्थांना कार्यालयीन बदलासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. सुरुवातीला दक्षिण मुंबईतील संस्थांशी पत्रव्यवहार करून, कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती केली. त्यानंतर, मुंबई पूर्व-पश्चिम उपनगरातील संस्थांना पत्र लिहण्यास सुरुवात केली. आता ठाणे, नवी मुंबईतील संस्थांना पत्र लिहून मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे.
पश्चिम रेल्वेच्या ऐतिहासिक वारशाचे सर्वसामान्यांना दर्शन घडणार आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेटस्थित मुख्यालयाच्या इमारतीला 125 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने आजपासून ऐतिहासिक प्रदर्शन सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुले केले आहे. 9 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. पश्चिम रेल्वेला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ऐतिहासिक वास्तूची तोंडओळख व पश्चिम रेल्वेचे बदलते चक्र प्रदर्शनातून दाखवले जात आहे. रेल्वेचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाबाबत लघुपट पर्यटकांना दाखवला जात आहे. तसेच वंदे भारतचे सिम्युलेटर स्थापित केले आहे. या प्रदर्शनात अनेक ऐतिहासिक कलाकृती, माहिती फलक, ट्रेन मॉडेल, अनेक ऐतिहासिक छायाचित्रे, ऐतिहासिक दस्ताऐवज ठेवण्यात आला आहे.