मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गाने संध्याकाळच्या वेळी लाखो प्रवासी प्रवास करतात. कारण संध्याकाळच्या वेळी अनेक ऑफिस, सरकारी कार्यालयाचे कर्मचारी घरी जाण्यासाठी निघालेले असतात. हा कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगर, ठाणे, दिवा, कल्याण, टिटवाळा, कसारा, बदलापूर, खोपोलीमध्ये राहतो. पण या कर्मचारी वर्गाला आज मध्य रेल्वे मार्गाने प्रवास करताना मनस्तापाला सामोरं जावं लागत असल्याची बातमी समोर आली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. कल्याण ते ठाणे रेल्वे स्टेशन दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. कळवा स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कल्याण ते ठाणे दरम्यान रेल्वे सेवा खोळंबली आहे. परिणामी मध्य रेल्वेवरील इतर रेल्वे स्थानकांवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे संध्याकाळी साडेचार वाजेपासून विस्कळीत झालेल्या वाहतुकीला अजूनही रुळावर यायला वेळ लागत आहे. जलग मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम पडलाय. संबंधित घटना घडल्यानंतर जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गाकडे वळवण्यात आल्या आहेत. पण अद्यापही हवी तशी वाहतूक पूर्वपदावर सुरु झालेली नाही. अनेक लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. परिणामी रेल्वे स्थानकांवर गर्दी बघायला मिळत आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर तर प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे.