Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, सेंट्रल, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक जाहीर
मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून सेंट्रल लाईनवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून सेंट्रल (Central) आणि (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत त्यापुढे नियोजित धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
मेगा ब्लॉक कसा असेल?
घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद येथे थांबणार नाहीत.
हार्बर लाईनवर ब्लॉक
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत सेवा प्रभावित होणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत, असं रेल्वेकडून कळवण्यात आलं आहे.
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर ते खारकोपर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
इतर बातम्या :