Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेची माहिती
मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून आज हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून आज हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर मध्य आणि पश्चिम या मेन लाईनवर मेगा ब्लॉक नाही, असं रेल्वे विभागाकडून कळवण्यात आलं आहे. मध्य रेल्वे रविवारी म्हणजेच आज हार्बर मार्गावरील उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक कार्यान्वित करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर लाईन सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत बंद असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील, असं मध्य रेल्वेकडून (Central Railway) कळवण्यात आलं आहे.
या देखील सेवा बंद राहणार
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र.8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील,असं मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे.
मेन लाईनवरुन प्रवास करण्याची परवानगी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विभागातील मेन लाईनवर मेगाब्लॉक असणार नाही. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, मेगाब्लॉक मुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.