मोटरमन अंत्यसंस्काराला गेले, मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत
मोटरमनच्या अपघाती मृत्यूनंतर मध्य रेल्वेच्या मोटरमन आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. याची प्रतिक्रिया म्हणून मोटरमनच्या संघटनांनी ओव्हरटाइम न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याचा परिणाम लोकल सेवेवर झाल्याने 88 लोकलसह 147 गाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्याने मुंबईची लाईफ लाईन सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल सुरु आहेत.
मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : मध्य रेल्वेच्या एका मोटरमनचा भरधाव एक्सप्रेसखाली अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. याचा निषेध म्हणून मोटरमनच्या युनियननी शनिवारी नियमानुसार काम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचा फटका मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला बसला आहे. या नियमानुसार काम आंदोलनामुळे मोटरमननी ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या 88 लोकलसह सुमारे 147 गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मुंबईची जीवन वाहीनी समजली जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली. शनिवारी दुपारपासूनच हा गोंधळ सुरु असून सायंकाळी कामावरुन घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल सुरु आहेत. दरम्यान, मोटरमनच्या पार्थिवावर दुपारी 12 वा. अंत्यसंस्कार होणार होते. यासाठी मोटरमन गेले होते. परंतू नातेवाईकांना येण्यास उशीर झाल्याने अंत्यसंस्कार सायंकाळी पाच वाजता झाले. त्यामुळे मोटरमन कामावर पोहचू शकले नाहीत. त्यामुळे लोकल गाड्यांना विलंब झाल्याने प्रवाशांना रात्री उशीरापर्यंत गर्दीचा सामना करावा लागला.
मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी मध्य रेल्वे प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने मध्य रेल्वेच्या मोटरमन आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यामुळे मध्य रेल्वे मजदूर संघाने ओव्हरटाइमला नकार देत नियमानूसार काम करण्याचे फलक झळकवले होते. नियमानूसार काम आंदोलन आणि गैरहजेरीचा परिणाम मध्य रेल्वेच्या रोजच्या लोकल फेऱ्यांवर झाला दुपारपासून मध्य रेल्वेच्या 88 लोकल सह सुमारे 147 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच लांबपल्ल्याच्या ट्रेनही लेट निघाल्या आहेत. मध्य रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवर मोटरमनच्या गैरहजेरीचा परिणाम झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील मोटरमनच्या विश्राम विश्रामगृहासमोर युनियननी टाईम असा बोर्ड लावून अतिरिक्त काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोटरमन होते कठोर कारवाई
मोटरमन कर्मचाऱ्यांवर लादलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे अनावधानाने एखादा सिग्नल जंप होतो. मात्र त्याचा फटका अनेक वर्षे काम केलेल्या मोटरमनना सेवेतून निलंबित तसेच बडतर्फ करण्यात होत असतो. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे युनियनने म्हटले आहे.
मोटरमन अंत्यसंस्काराला गेले, रेल्वे सेवा विस्कळीत
काल मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांचा एक्सप्रेसच्या धडकेने मृत्यू झाला. या मोटरमनच्या पार्थिवावर शनिवारी दु. 12 वा. अंत्यसंस्कार होणार होते. मात्र जवळचे कुटुंबीय उशिराने पोहोचल्याने सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने मोटरमन उपस्थित असल्याने ते ट्रेनच्या कामकाजासाठी अनुपलब्ध होते. त्यामुळे दिवसभरात 88 लोकल ट्रेनसह सुमारे 147 गाड्या रद्द करण्यात झाल्या याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाल्याचे म्हटले जात आहे . सायंकाळच्या वेळी घरी परतणाऱ्या प्रवाशांचा त्यामुळे चांगलाच खोळंबा झाला. कल्याण रेल्वे स्टेशनवर तासनतास प्रवासी खोळंबून होते. कल्याण स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. प्रवाशांना याबाबत नेहमीप्रमाणे रेल्वेने गृहीत धरुन कोणतीही अनाऊन्समेंट न करता योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.