Mahavikas Aaghadi : मध्यरात्री दिल्लीत खलबतं, महायुतीच्या बैठकीत फॉर्म्युला ठरला? मग महाविकास आघाडीतील अपडेट काय?
Maharashatra Vidhansabha Election 2024 : महायुतीच्या शिलेदारांची दिल्लीत मध्यरात्री खलबतं झाली. अमित शाह यांच्या घरी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. आज महायुती उमेदवार जाही करण्याची शक्यता आहे. पण कालच्या बैठकीपूर्वीच जागा वाटपावरून घमासान सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीची कोंडी फुटली की नाही?
महाराष्ट्रात निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तीव्र मतभेद पण समोर येत आहे. त्यातच जागा वाटपात महायुतीने आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीत जागा वाटपावरून युती होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी मध्यरात्री महाराष्ट्रातील शिलेदारांसोबत त्यांनी जागा वाटपावर मंथन केले. रात्री उशीरा चाललेल्या या बैठकीत सहमती झाल्याची माहिती समोर येत आहे. महायुती आज उमेदवारांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद जाहीरपणे समोर आले. महाविकास आघाडी त्यावर काय तोडगा काढते हे लवकरच समोर येईल.
जागा वाटपावरच आडले की घोडे
महाविकास आघाडीत जागा वाटपावर मॅरेथॉन बैठकी झाल्या. पण त्यात काही जागांवरून मोठी रस्सीखेच झाल्याचे दिसून येते. शिवसेना उद्धव ठाकरे गट या जागा वाटपावर नाराज असल्याचे काल उघड झाले. काँग्रेसवर संजय राऊत यांनी थेट हल्लाबोल केला. स्थानिक काँग्रेस नेतृत्वाला शह देण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांशी बोलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले आहे.
निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करूनही महाविकास आघाडीत एकोपा दिसून आला नाही. तीनही पक्षातील कुरबुरी समोर आल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. एकाच मतदारसंघात अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. गेल्या तीन आठवड्यात महाविकास आघाडीत 12 हून अधिक बैठकी झाल्या. त्यात 288 जागांवर अजून सहमती होऊ शकली नाही. त्यावर आता तोडगा काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
ठाकरे गट- काँग्रेसमध्ये घमासान
हरयाणा, जम्मू आणि काश्मीरमधील निकाल काँग्रेसला मोठे बळ देऊन गेले नाहीत. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील विधानसभेत पण दिसला. लोकसभेत काँग्रेसचा वरचष्मा दिसला. आता बार्गेनिंग पॉवरमध्ये घटक पक्ष काँग्रेसवर दबाव आणताना दिसत आहेत. संजय राऊत आक्रमक दिसले. त्यांनी स्थानिक काँग्रेस नेतृत्वावर आगपाखड केली. रामटेक आणि अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आले, त्याबदल्यात विधानसभेत काँग्रेसने झुकते माप घेण्याची मागणी होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत आतापर्यंत काँग्रेस 103 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 85 जागा, तर उद्धव ठाकरे गटाला 90 जागा असे समीकरण जुळाल्याची चर्चा आहे. आतापर्यंत एकूण 278 जागांवरील तिढा सोडवण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. विदर्भातील 10 जागांवर घोडं आडलं आहे.
महाविकास आघाडीत 48 जागांवर नाही एकमत
ताज्या अपडेटनुसार महाविकास आघाडीत 48 जागांवर अद्याप एकमत झालेले नाही. विदर्भाच्या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाले आहेत. विदर्भात काँग्रेसचा बोलबाला., तिथे शिवसेना हरणार , ज्या जागा जिंकता येणार नाही त्या मागण्यामागे काही स्वार्थ दडलाय का? असा खोचक सवाल नाना पटोले यांनी संजय राऊतांना विचारल्याची सुत्रांची माहिती आहे.
नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध पराकोटीला गेल्याने परवाच्या सोफीटेल हॉटेलच्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नसल्याची सुत्रांची माहिती आहे. नाना पटोले आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी फोनवर पुन्हा चर्चा करणार आहेत. शिल्लक 48 जागांबाबत दिल्लीत पक्ष श्रेष्ठींकडून तोडगा काढला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.