VIDEO: एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपावर ‘व्हायरल मेसेजचं’ संकट? पडळकर, खोत नाराज? संपातून निघून जाण्याची तयारी?
राज्य सरकारने एसटी कामगारांना दिलेल्या पगार वाढीच्या ऑफरवर आज चर्चा होणार असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई: राज्य सरकारने एसटी कामगारांना दिलेल्या पगार वाढीच्या ऑफरवर आज चर्चा होणार असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका व्हायरल मेसेजमुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कामगारांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं. पडळकर-खोत यांनी या आंदोलनातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. एसटी कामगारांनी या दोन्ही नेत्यांना रोखून धरल्याने अखेर हे संकट टळलं. मात्र, हे मेसेज कुणी व्हायरल केले याबाबतचं गुढ अजूनही कायम आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत काल गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. यावेळी कामगारांना विलीनीकरण होईपर्यंत अंतरीम वेतनवाढ देण्याचा पर्याय समोर आला. त्यावर आज पुन्हा चर्चा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच पडळकर आणि खोत यांच्याबाबतचे काही मेसेज व्हायरल झाले. त्यामुळे पडळकर आणि सदाभाऊ खोत प्रचंड नाराज झाले. त्यांची नाराजी त्यांनी थेट कामगारांना बोलून दाखवली. त्यामुळे आंदोलनस्थळी संभ्रमाचं वातावरण झालं होतं.
काय होता मेसेज
गोपीनाथ पडळकर आणि सदाभाऊ खोत हे सरकार दरबारी हातमिळवणी करत आहेत, अशा आशयाचा मेसेज कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजबाबतची माहिती पडळकर आणि खोत यांना मिळाल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या दोघांनीही आज सकाळीच आझाद मैदान गाठून कामगारांशी चर्चा केली. तसेच या व्हायरल मेसेजबाबत नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांपासून हे मेसेज व्हायरल होत आहेत. असं होत असेल तर आम्ही आंदोलनात राहण्यात अर्थ नाही, असं सांगत त्यांनी आंदोलनातून जाण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही नेते जात असताना कामगारांनी मात्र त्यांना रोखले. तुम्ही आंदोलनातून जाऊ नका. तुम्ही आंदोलनात हवे आहात असं कामगारांनी सांगितलं. तरीही पडळकर ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने कामगारांनी त्यांना अक्षरश: खांद्यावर उचलून घेतले आणि घोषणाबाजी सुरू केली. एकच भाऊ सदाभाऊ, एकच छंद गोपीचंद असे नारे द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर पडळकर-खोत यांनीही मैदान न सोडण्याचा निर्णय घेतला.
अफवा उठवली जात आहे
आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमचं आंदोलन सुरू ठेवा. आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही. आम्ही सरकारसोबत चर्चा केली म्हणून काही लोकांनी अफवा उठवली आहे. यात काही अर्थ नाही. आपली एकजूट कायम ठेवा, असं आवाहन पळकर यांनी केलं.
काही लोक आंदोलनाची दिशा बदलत आहेत
आमच्यावर तुमचा विश्वास आहे का? असा सवाल खोत यांनी कामगारांना केला. काही लोक आंदोलनाची दिशा बदलत आहेत. आमच्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत राहायचं की नाही हे तुम्हीच सांगा, असं खोत म्हणाले.
संबंधित बातम्या:
वर्चस्ववादातून रक्तचरित्र, उद्योगनगरी नाशिकमध्ये खुनामागून खून; डोक्यात दगड घालून तरुणाला संपवले
Homemade Face Mask : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ 5 होममेड फेस मास्क फायदेशीर!
इंजिनिअरिंगला अच्छे दिन, प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली, नेमकं कारण काय?