मुंबई : सीएनजीचे ( CNG ) दर वाढल्याने टॅक्सी (Taxi ) आणि रिक्षा चालकांनी परिवहन विभागाकडे ( Transport Department ) भाडेवाढीची ( Fare ) मागणी केली होती, त्यानुसार राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीची भाढेवाढ ( Fare Hike ) करण्यात आली, इलेक्ट्रॉनिक्स मीटर असल्याने अंतरानुसार मीटरमध्ये योग्य ती सेटिंग्ज करण्यासाठी (RE-CALIBERATION – रिकॅलिबरेशन ) वेळ जात आहे, त्यासाठी आरटीओच्या मॅकेनिककडे रांगा लागल्या आहेत, येत्या 15 जानेवारीपर्यंत हे मीटर कॅलीबरेशनचे काम चालणार आहे. या दरम्यान ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाढीव भाड्याचा चार्ट टॅक्सी चालकांना लॅमिनेशन करुन दिला आहे. काळी- पिवळीचे टॅक्सी चालक त्यानूसार ग्राहकांकडून त्यानुसार भाडे घेत आहेत. परंतू सर्वच क्षेत्रात चांगले वाईट लोक असतात, तसेच या क्षेत्रातही आहेतच. काहींनी ग्राहकांकडून जास्त पैसे कसे वसूल करता येतील यासाठी बनावट चार्ट बनवल्याचं सांगण्यात येतं. परिवहन विभागाने नवीन भाडेवाढीचे चार्ट जारी केले आहेत, पण उभेउभ रंगसंगतीचे पण भाड्याचे आकडे जास्त असणारे बनावट चार्ट काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडे आहेत.
मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये टॅक्सी, रिक्षा हा लोकांसाठी महत्त्वाचा भाग आहे. अशा घाईगर्दीत बनावट चार्ट दाखवून तुमच्याकडून पैसे वसूल केले जात असतील तर वेळेतच सावध व्हा आणि बातमीसोबत देत असलेला हा चार्ट नक्की पाहा.
इलेक्टॉनिक्स मीटरमध्येही काही टॅक्सी चालकांनी घोळ केला आहे, हे असे मीटर सेट करणारे मॅकेनीक मुंबईत असल्याचं नाव न छापण्याच्या अटीवर अनेक टॅक्सी चालक मान्य करतात. अशा प्रकारे मीटर फास्ट पळण्यासाठी होत असलेल्या सेटिंग्जमुळे टॅक्सी चालकांवर असलेला लोकांचा विश्वास कमी होतो आहे, त्यामुळे भाढेवाढीची मागणी करण्यासाठी टॅक्सी चालक संघटना जशा पुढाकार घेतात, त्याप्रमाणे त्यांनी टॅक्सी चालकांवरील लोकांचा विश्वास कमी होवू नये, म्हणून या टॅक्सी संघटनांनी चुकीचे मीटर सेटिंग्ज करु नका, म्हणून टॅक्सी चालकांना समज देणे गरजेचे आहे.
अजूनही 15 जानेवारीपर्यंत मीटर कॅलिबरेशनचे काम चालणार आहे, त्यामुळे बातमीसोबत असलेले चार्ट पाहूनच तुम्ही प्रवासाचं भाडं द्यावं लागणार आहे. जेवढं जास्त लांब अंतर तेवढी मीटर सेटिंग्जमुळे तुमची जास्त लूट होवू शकते. तेव्हा हा चार्ट नीट लक्षात ठेवा…