Eknath Shinde : पंतप्रधान देहूत तुकारामाला भेटायला आले अन् एकनाथाला घेऊन गेले; भुजबळांचा भाजपाला टोला
आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित असतील. राज्यातील परिस्थितीवर चर्चा होईल का, असे विचारले असता, मला तर ही रेग्यूलर कॅबिनेटची मिटिंग वाटत आहे. वेगळी काही चर्चा होईल असे वाटत नाही, असे ते म्हणाले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देहू याठिकाणी संत तुकाराम महाराजांना भेटायला आले आणि एकनाथाला (एकनाथ खडसे) यांना घेऊन गेले, असा टोला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपाला लगावला आहे. मुंबईत ते बोलत होते. राष्ट्रवादीची बैठक शरद पवार यांनी बोलावली, त्या बैठकीस आले असता ते बोलत होते. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर काही मार्ग निघतो का, या विषयावर शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परवापासून नॉट रिचेबल होत बंडाचे निशाण फडकावले. आता शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत 46 आमदार त्यांच्यासोबत असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेचे एकूण आमदार 55 आहेत. त्यातील 46 आमदार आता शिंदेंसोबत असल्याचे बोलले जात आहे.
‘रेग्यूलर कॅबिनेटच वाटतेय’
आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. राज्यातील परिस्थितीवर चर्चा होईल का, असे विचारले असता, मला तर ही रेग्यूलर कॅबिनेटची मिटिंग वाटत आहे. वेगळी काही चर्चा होईल असे वाटत नाही, असे ते म्हणाले. आता महाविकास आघाडी सरकारचा आकडा अत्यंत कमी झाला आहे, त्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदी देहूला संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले. त्यामुळे किती संख्याबळ आहे, यासाठी थोडी वाट पाहावी लागेल, असे ते म्हणाले.
‘कधी कानावर आले नाही’
दोन तृतीयांश हून अधिक आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत, असा दावा केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असंतोष असेल याविषयी कधी काही कानावर आले नाही. पण सरकार पडणे, बरखास्त होणे, पुन्हा नव्याने निवडून येणे, सत्ता स्थापन करणे अशा सर्व गोष्टी आम्हाला काही नव्या नाहीत. सध्याच्या परिस्थितीवर इतक्यात बोलणे घाईचे होईल. थोडी वाट पाहावी लागेल, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.