गडकोटांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी धडक मोहीम उघडावी, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांचे केले कौतूक…
अफझलखान कबरीवरील अतिक्रमण हटविल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
मुंबईः अफझलखान कबरीवरील अतिक्रमण हटविल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर इतर किल्ल्यांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी सरकारने धडक मोहीम उघडावी असे सांगत, त्यांनी या मोहिमेस पूर्ण सहकार्य करणार असल्याचीही ग्वाही यावेळी त्यांनी पत्रकातून दिली आहे.
स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाही सरदार अफझलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ठार मारले. मरणानंतर वैर संपते, या भावनेने महाराजांनी त्याच ठिकाणी विधीवत दफन करून खानाची कबर बांधली, असे इतिहासकारांचे मत आहे.
परंतु अलीकडच्या काळात काही लोकांनी अफझलखानाचे उदात्तीकरण करत या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी जमिनीवर ताबा मिळवला होता.
न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊनही हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवले नव्हते. परंतु काल शिवप्रताप दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करण्यात आली.
अफजल खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे तितके थोडे आहे असं मत माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
सरकारच्या या कार्यवाहीने एक चांगली सुरूवात झालेली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. केवळ प्रतापगडच नव्हे तर शिवरायांच्या अनेक किल्ल्यांना या अतिक्रमणाच्या व्याधीने ग्रासलेले आहे.
विशाळगड हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. मात्र लोहगड, मलंगगड सारख्या अनेक किल्ल्यांवरदेखील अलीकडच्या काळात ही व्याधी जडत चाललेली आहे.
यंत्रणांच्या हेतुपुरस्पर डोळेझाकीमुळे या गडकोटांच्या गौरवशाली इतिहासावर आघात घातला जात असल्याची टीकाही संभाजीराजे यांनी केली आहे.
काही महिन्यांपूर्वी रायगडावर दर्गा उभारण्याचा प्रकार शिवभक्तांच्या पाठिंब्यामुळे आम्ही हाणून पाडला होता. आम्हाला रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराची साधी डागडुजी करायची असली तरी परवानग्या आणायला दिल्लीत पन्नास बैठका घ्याव्या लागतात आणि इतके करूनही परवानगी मिळत तर नाहीच.
मात्र इतरांना हे नियम लागू होत नाहीत का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे माजी खासदार संभाजीराजे यांनी ही मुजोरी मोडून काढण्याच्या दिशेने सरकारने पहिले पाऊल टाकले आहे, याबद्दल सर्व शिवभक्तांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. केवळ इतक्यावरच न थांबत राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर झालेली अशी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे सरकारने धडक मोहीम उघडून जमीनदोस्त करावीत. या मोहिमेत आमचे पूर्ण सहकार्य असेल अशी ग्वाही देतो असही त्यांनी म्हटले आहे