गँगस्टर छोटा राजनच्या भावाची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; सर्वच निवडणुका लढवणार?
दीपक निकाळजे हे गेल्या 20 वर्षापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. आधी ते रिपाइं नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यानंतर त्यांनी आठवले यांच्यापासून वेगळे होत स्वत:चा गट स्थापन केला.

मुंबई: मुंबई-ठाण्यासह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या पातळीवर निवडणुकांची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अगदी भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षापासून आरपीआयचे छोटे छोटे गटही या कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आरपीआय (ए)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गँगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. आरपीआय (ए)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
चेबूर येथे काल रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ची एक परिषद पार पडली. यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजे यांची निवड करण्यात आली. या परिषदेत देशभरातील 30 राज्यांमधून आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.



पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दीपक निकाळजे यांनी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली आहे. आंबेडकरी विचारांच्या सर्वच नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅनरखाली एकत्र येऊन काम करावं अशी भूमिका दीपक निकाळजे यांनी मांडली.
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए सुद्धा एक्शन मोडमध्ये येणार असल्याचे संकेत देण्यात आले. तसेच आरपीआयकडून सर्वच निवडणुका लढवण्याची तयारीही सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
आमच्या पक्षाचं हे दहावं राष्ट्रीय अधिवेशन आहे. मी अध्यक्ष झाल्यानंतरचं हे पहिलं राष्ट्रीय अधिवेशन आहे. माझी बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महापालिका निवडणुकीसाठी आमच्या पक्षाची तयारी सुरू आहे. आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं टार्गेट आहे, असं निकाळजे यांनी सांगितलं.
आमचा पक्ष 1990पासून आहे. पण पक्षाची वाढ झाली नाही. त्याची कारणं आम्ही शोधली आहेत. त्यामुळे पक्ष वाढीसाठी आम्ही काम करणार आहोत. आम्हाला कुणी युती किंवा आघाडीची ऑफर दिली तर आम्ही आमच्या पक्षाचं हित पाहूनच पुढील निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. आमची ताकद विखुरल्या गेली होती. ती एकत्र करण्याचं आमचं ध्येय आहे. आमच्या पक्षाचे नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही त्यांनी सांगितलं.
दीपक निकाळजे हे गेल्या 20 वर्षापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. आधी ते रिपाइं नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यानंतर त्यांनी आठवले यांच्यापासून वेगळे होत स्वत:चा गट स्थापन केला. या गटाचं मुंबईसह ठाणे जिल्ह्यात चांगलं प्राबल्य आहे. तसेच सामाजिक काम करण्यासाठी दीपक भाऊ निकाळजे सामाजिक प्रतिष्ठानचीही स्थापना करण्यात आलेली आहे.
दीपक निकाळजे यांनी चेंबूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही वेळा चांगली मते घेऊनही त्यांना यश आलं नव्हतं. यावेळी पुन्हा एकदा ते चेंबूरमधून निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्याबाबतचं कोणतंही सुतोवाच त्यांनी अद्याप केलेलं नाही.