BREAKING : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या भावाचा थेट मुंबई पोलिसांना इशारा, म्हणाला…
छोटा राजनचा भाऊ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे (Deepak Nikalje) यांनी पोलिसांनाच इशारा दिल्याची माहिती समोर आलीय.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देणारं बॅनर मालाडमध्ये लावण्यात आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. पण पोलिसांच्या या कारवाईवर छोटा राजनचा भाऊ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे (Deepak Nikalje) यांनी टीका केलीय. विशेष म्हणजे निकाळजे यांनी पोलिसांना आव्हानच दिलं की काय? असा प्रश्न उपस्थित होईल असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “माझा भाऊ आहे, मी वाढदिवस साजरा केला. मला पकडायचं असेल तर पकडा. जे काय आहे ते आम्ही बघू”, असं विधान दीपक निकाळजे यांनी केलंय. त्यामुळे निकाळजे यांनी पोलिसांना इशाराच दिलाय की काय? असाही प्रश्न उपस्थित होतोय.
“कुणाचा वाढदिवस कोणी साजरा करायचा याचं प्रत्येकाला स्वतंत्र आहे. त्याचं मला नवल वाटत नाही. माझा भाऊ आहे, मी वाढदिवस साजरा केला. मला कोणी अटक केली नाही. सांगा असं काय असेल तर, पकडायचं असेल तर पकडा, जे काय आहे ते बघू आम्ही”, असा थेट इशाराच दीपक निकाळजे यांनी दिला.
“एरव्ही माझ्याकडे कोणी येत नाही. पण जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा छोटा राजांचा भाऊ दिसतो का? इतरवेळी दिसत नाही का?”, असे प्रश्न दीपक निकाळजे यांनी उपस्थित केले.
नेमकं प्रकरण काय?
छोटा राजनचा 13 जानेवारीला वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मालाड पूर्व गणेश मैदान तानाजी नगर, कुरार व्हिलेज येथे छोटा राजनच्या (नाना) वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही कबड्डी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी परिसरात एक बॅनरही लावण्यात आले होते. पण त्यावर छोटा राजन हा आधारस्तंभ असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. संबंधित बॅनरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
याआधीही अनेकदा बॅनर लावण्याचा प्रयत्न
विशेष म्हणजे छोटा राजनला अशाप्रकारे जाहीरपणे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची ही पहिली घटना नाही. याआधीदेखील अनेकदा असा प्रकार घडला आहे. 2020 मध्येही छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी काही लोकांवर गुन्हाही दाखल केला होता. या लोकांनी ठाण्यात दोन ठिकाणी बॅनर लावले होते.