मुंबई : कोरोना काळानंतर यंदा दहीहंडी उत्सव (Dahihandi) राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांकडून मोठमोठ्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. राजकीय नेतेही आज या दहीहंडी कार्यक्रमात सहभागी होताना आपल्या दिसणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात होणारा हा पहिलाच मोठा जन उत्सव असणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही मुंबई आणि ठाणे परिसरात निरनिराळ्या राजकीय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावणार आहे. एकनाथ शिंदे अकरा ठिकाणी तर देवेंद्र फडणवीस हे सात ठिकाणी या कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत.