शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. विशेष सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या.
ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे 498 A कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
महिलेवर सामूहिक अत्याचार आणि तिची हत्या करणाऱ्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या आहेत. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.