राज्यात महिनाभरातील पाऊस अवघ्या तीन दिवसांत, धरणातील जलसाठा वाढला
मुंबईसह राज्यात 4 दिवसात तब्बल 606 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सरासरी 90 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिक हैराण झाले असले तरी, धरणांच्या पातळीत मात्र वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस बरसयाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचले. आज (1 जुलै) मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही रेड अर्लट देण्यात आला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिक हैराण झाले असले तरी, धरणांच्या पातळीत मात्र वाढ झाली आहे.
दरम्यान मुंबईसह राज्यात 4 दिवसात तब्बल 606 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सरासरी 90 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दोन वर्षापूर्वी म्हणजेच 7 जून ते 30 जूनपर्यंत 23 दिवसांच्या कालावधीत राज्यात 991 मिमी पाऊस झाला होता. याची तुलना केल्यास यंदाच्या वर्षी 67 टक्के पाऊस हा फक्त अवघ्या चारच दिवसात पडला आहे.
तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मागच्या 24 तासात 92.6 मिमी पर्यंत पाऊस पडला आहे. तर सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 91.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर 1 जुलै 2019 पर्यंत मुंबईत कुलाबा भागात 433 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सांताक्रुज भागात 607 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान गेल्यावर्षी जुलै 2018 मध्ये कुलाबा भागात 794.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सांताक्रुझ परिसरात 749.2 मिमी पावसाची नोंद केली आहे. या आकडेवारीची तुलना केल्यास यंदाच्या वर्षी 60 टक्के पाऊस 1 जुलैपर्यंत पडला आहे. दरम्यान मागील 24 तासांत मुंबई शहरात 118 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुर्व उपनगरात 99.02 मिमी, तर पश्चिम उपनगरात 70.61 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मागील तीन ते चार दिवसातील पावसामुळे राज्यातील धरणाचा जलसाठा वाढवायला सुरुवात झाली आहे. कोकण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या ठिकाणच्या धरणात चांगलीच वाढ झाली आहे.
आतापर्यंत काही धरणातील साठ्यात 7 ते 8 टक्के वाढ झाली आहे. तर कोकणात धरणसाठा 3 टक्क्यांनी वाढला आहे. या शिवाय पुणे, नाशिक, नागपुर आणि अमरावती विभागातील धरणातला जलसाठाही वाढायला सुरुवात झाली झाली आहे.