मतदारांची माहिती आधारला लिंक करा : मुख्यमंत्री फडणवीस
मतदार ओळखपत्र आधार कार्डला लिंक करण्याची मागणी होत आहे. ही मागणी दुसरी तिसरी कुणीही केलेली नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केली आहे.
मुंबई : मागील बऱ्याच काळापासून नागरिकांनी बँक खाते आधारशी लिंक करायचे ऐकले असेल, मात्र आता मतदार ओळखपत्र देखील आधार कार्डला लिंक करण्याची मागणी होत आहे. ही मागणी दुसरी तिसरी कुणीही केलेली नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून मागणी केली.
प्रत्येक निवडणुकीत मतदार यादीतील घोळ होतो. अनेक मृत नागरिकांची नावं मतदार यादीत असतात, तर अनेक जीवंत नागरिकांची नावं मतदार यादीतून गायब होतात. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानाचा हक्कही बजावता येत नाही. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर अनेक मृत नागरिकांच्या नावे बोगस मतदान झाल्याच्याही तक्रारी येतात.
आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा बोगस मतदान आणि मतदार यादीतील घोळ हे विषय चर्चेला येत आहे. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट मतदान ओळखपत्र आधार कार्डला लिंक करण्याची मागणी केली.
जितेंद्र आव्हाडांची विधानसभेतील मागणी
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत हा विषय मांडत मतदान यादी आधारशी लिंक करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. आधार मतदार ओळखपत्राला लिंक झाल्यास मोठा खर्च आणि गोंधळ टळेल असे सांगितले जात आहे.
हा निर्णय घेण्यापुढील आव्हाने
सर्वोच्च न्यायालयाने याअगोदरच आधारचे बँक खात्यांशी संलग्नीकरण बंधनकारक करता येणार नसल्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी अनेक नागरिकांचा बायोमॅट्रिक डाटा घेण्यातील अडथळ्यांच्या मर्यांदांचाही विचार करण्यात आला होता. आधारबाबत याआधी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. माहितीच्या गोपनीयतेपासून, माहितीची चोरी, गुप्त देखरेख आणि इतरही अनेक आक्षेप घेतले गेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचा निर्णय घेतल्यास यावर काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.