झेडपीच्या 13 शाळा इंटरनॅशनल होणार, इंग्रजी बोर्डांना टक्कर देणार
मुंबई: महाराष्ट्रतील 13 जिल्ह्यातील 13 शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असं संबोधलं जाणार आहे. शाळेची नावं तीच राहतील केवळ पॅटर्नचं नाव अटलजींचं राहील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज या नावांची घोषणा झाली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री […]
मुंबई: महाराष्ट्रतील 13 जिल्ह्यातील 13 शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असं संबोधलं जाणार आहे. शाळेची नावं तीच राहतील केवळ पॅटर्नचं नाव अटलजींचं राहील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज या नावांची घोषणा झाली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते.
सीबीएसई आणि आयसीएसई या इंग्रजी माध्यमातील बोर्डांना टक्कर देतील, महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड अर्थात एमआयईबीची स्थापना करु असं राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं. पहिल्या टप्प्यात 13 शाळांची निवड करण्यात येणार होती, ती आज केली.
सध्याची यंत्रणा, शिक्षक तेच असेल, मात्र त्यात सुधारणा करुन शिक्षणात नवे प्रयोग केले जाणार आहेत.
This Maharashtra International Education Board was set up by Maharashtra Government for high education standards and continuous efforts towards value education. Initially 13 ZP schools would be a part of this International board and curriculum will be in mother tongue. pic.twitter.com/PtyK9nhRvH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 25, 2018
राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळेतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसापूर्वी घेतला होता. यात राज्यातील 107 शाळांनी सहभाग घेतला होता. शाळेची गुणवत्ता आणि दर्जा यांचा विचार करुन महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील 13 शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “देशाचा विकासदर वाढवून उत्तम दर्जा देण्याचं काम अटलजींनी केलं. भारतीयांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण भारतात आणलं. अनेक वर्ष विरोधात काम कारताना मला खंत वाटायची, शिक्षणात महाराष्ट्र मागे. मात्र आमचं सरकार आल्यावर शिक्षण विभागात उत्तम काम सुरु आहे. दोन वर्षात शिक्षणावर इतकं काम केलंय की महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आला. महाराष्ट्रात हजारो शाळा आहेत, त्यांची शैक्षणिक क्षमता आहे. जिल्हा परिषद शाळा चालवायच्या कशा, हा सवाल होता, मात्र आता अनेक मुले या शाळांकडे वळत आहेत. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण मंडळाने खूप मेहनत घेतली. सध्या 13 शाळा, तर पुढच्या वर्षी 100 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करता येतील”.
शिक्षणमंत्री विनोद तावडे
यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील शिक्षण विभागाचा चढता आलेख मांडला.
“ग्रामविकास आणि शिक्षण विभागाचा समन्वय चांगला आहे. शिक्षण विभागाच्या अनेक योजना पूर्ण केल्या जातात. 30 हजारपेक्षा जास्त मुले आंतरराष्ट्रीय शाळेतून जिल्हा परिषद शाळेत आली. गेल्या चार वर्षात अनेक निर्णय घेतले, ते लोकांना आवडले. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची आज सुरुवात होतेय. या वर्षी 13 शाळा सुरू केल्या, पुढल्या वर्षी 100 शाळा तयार करु”, असं विनोद तावडे म्हणाले.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावेडकर यांनी ऑपरेशन डिजीटल बोर्ड सुरु करत असल्याचं सांगितलं. सर्वत्र डिजीटल यंत्रणा राबवणार आहे. नववी ते पदवी सगळ्या वर्गात डिजीटल बोर्ड असतील, असं जावडेकर म्हणाले.