BREAKING : मुख्यमंत्र्यांनी बोलावली ‘शिंदे’ गटाची महत्त्वाची बैठक, ‘वर्षा’वर खलबतं, पडद्यामागे भरपूर काहीतरी घडतंय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
मुंबई : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या घडामोडींना आतापासून सुरुवात देखील झालीय. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलीय. संबंधित बैठक सुरुदेखील झालीय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका निवडणुका, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी ही महत्त्वाची बैठक मानली जातेय. मुख्यमंत्री आपल्या शिलेदारांना जबाबदारी वाटून देण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय-काय गोष्टी करायला पाहिजेत, याबाबत रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री उदय सामंत, तसेच शिंदे गटाचे नेते भरत गोगावले, किरण पावसकर आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या बैठकीत पक्षासंदर्भात देखील महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना मोठा झटका
दुसरीकडे शिंदे गट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनादेखील जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहे. युवासेनेचे काही पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवासेना महाराष्ट्र प्रदेश सहसचिव शर्मिला येवले यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतलीय.
विशेष म्हणजे शर्मिला येवले यांनी कालच पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की, आम्हाला ठाकरे गटामध्ये कामासाठी संधी मिळत नाही. त्यामुळे येवले शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
अखेर संबंधित वृत्त खरं ठरण्याची शक्यता आहे. कारण विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या लवकरच शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत.