मोठी बातमी! खराब हवामानाचा फटका, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे विमान माघारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करत असलेल्या विमानाला खराब हवामानाचा फटका बसला आहे. मुंबई विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले होते.
दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करत असलेल्या विमानाला खराब हवामानाचा फटका बसला आहे. मुंबई विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र, खराब हवामानामुळे विमान माघारी परतले. आता शिंदे-फडणवीस यांना दुसऱ्या विमानाने प्रवास करावा लागणार होता. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता वर्षा निवासस्थानाकडे निघाले आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जामनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण सुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने विमानाला परत माघारी यावे लागले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कालिना एअरपोर्टच्या गेट क्रमांक सहावर आले. तिथून त्यांचा ताफा वर्षा निवासस्थानी निघाला. त्यामुळे त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे. मात्र, वर्षा निवासस्थानी गेल्यानंतरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जळगावला जाणार की नाही याची अधिकृत माहिती कळणार आहे.
जळगावच्या जामनेरमधील गोद्री येथे गेल्या सहा दिवसांपासून कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक जमा झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कुंभमेळ्याला उपस्थित राहण्यासाठी येणार होते.
मंदिराचं उद्घाटन
यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बंजारा समाजाच्या संताच्या मंदिराचं उद्घाटनही करण्यात येणार होतं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योग गुरू रामदेव बाबाही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शिंदे या दौऱ्याला जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संध्याकाळी खासदारांची बैठक
दरम्यान, आज संध्याकाळी शिंदे गटाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी 5 वाजता खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे शिंदे या बैठकीसाठी आजचा जळगाव दौरा रद्द करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.