BREAKING | हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री पुन्हा दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. ते दिल्लीला जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई | 21 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री आठ वाजता दिल्लीच्या दिशेला रवाना होणार असल्याची मोठी बातमी सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आसनव्यवस्था विशेष ठिकाणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मधोमध एकनाथ शिंदे यांची बैठकीत बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली. तर अमित शाह यांच्या बाजूला अजित पवार बसले होते.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री विमानतळाच्या दिशेला निघाल्यानंतर अजित पवार आणि अमित शाह, नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांच्यात अर्धा तास बैठक पार पडल्याची माहिती समोर आलेली. अजित पवार आणि नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.
मुख्यमंत्री दिल्लीला नेमकं का जात आहेत?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीच्या दिशेला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे आज संध्याकाळी अधिवेशन संपल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास दिल्लीला रवाना होतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला एका खासगी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा मुंबईसाठी रवाना होणार आहेत. या दरम्यान त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात मोठं काही घडणार?
एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत अनेक दौरे झाले आहेत. मुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडतात, असं गेल्या काही दिवसांमध्ये बघायला मिळालं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानंतर राज्यात काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व 9 मंत्र्यांसाठी खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात शिंदे गटाच्या मंत्र्यांचे देखील काही खाती अजित पवार गटाकडे गेले आहेत. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटायचा राहिला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार होईल, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.