मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयानक झाली आहे. राज्यात ऑक्सिजनचा साठाही अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनाच फेसबुकवरून लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी द्यावी, असं आवाहन केलं आहे.
गेल्या चार दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. त्यातच आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रात्री राज्यातील जनतेशी संबोधित करणार असल्याचं वृत्त आल्याने मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधानांशी माझी नुकतीच बैठक झाली आहे. त्यात त्यांना ऑक्सिजनची मागणी केली आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांच्याकडे केला आहे. त्यांनी परवानगीही दिली आहे. मात्र, ईशान्येकडील राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करून रस्ते मार्गे हे ऑक्सिजन आणावं लागणार आहे. परंतु आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे. त्यामुळे रस्तेमार्गे ऑक्सिजन आणणं परवडणारं नाही. त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची पंतप्रधानांनी परवानगी द्यावी. मी फेसबुकवरून तुमच्या माध्यमातून पंतप्रधानांना आवाहन करत आहे. आणि त्यांना पत्र लिहूनही मागणी करणार आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
अन्न धान्य आणि आर्थिक मदतीची घोषणा
राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार. पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार. आधी 10 रुपयांची थाळी 5 केली आता मोफत करणार. ही सरकारची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील 35 लाख लोकांना 1000 रुपये आगाऊ देणार, तसेच राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार. त्याचा 12 लाख कामगारांना उपयोग होणार आहे. आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे. त्याशिवाय घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत देण्यात येणार असून अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
जिल्हाधिकाऱ्यांना 330 कोटींचा निधी
कोविड संदर्भातील सुविधा उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 330 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत. तसेच या सर्व पॅकेजसाठी 5400 कोटी रुपये निधी बाजूला काढून ठेवले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
15 दिवस संचारबंदी
राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. 15 दिवस ही संचारबंदी राहणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच या संचारबंदीतून अत्यावश्यक सुविधा वगळण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी
‘त्या’ युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात, उद्धव ठाकरेंचे लॉकडाऊनचे संकेत
राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा