मुंबई: राज्यसभा निवडणुकीची विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने (shivsena) खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. तर विधान परिषदेची निवडणूक कठिण असल्याने भाजपनेही (bjp) अत्यंत बारकाईने या निवडणुकीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळपासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आपआपल्या आमदांना मार्गदर्शन केलं आहे. गुप्त मतदान असल्याने मतदान कसं करायचं? मतपत्रिकेची घडी कशी मारायची? पहिल्या पसंतीची मते आणि दुसऱ्या पसंतीची मते कशी द्यायची? याबाबतचं मार्गदर्शन या नेत्यांकडून आमदारांना दिलं गेलं आहे. त्यानुसार या आमदारांनी मतदानही केलं आहे. तसेच मत फुटू नये म्हणून संशयास्पद वाटणाऱ्या आमदारांना विश्वासातही घेतलं गेलं आहे. त्यामुळे आता निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सकाळीच राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत नाश्ता केला. त्यांच्याशी चर्चा करत त्यांना मतदान कसं करायचं याबाबतचं मार्गदर्शन केलं. तसेच मते फुटू नयेत म्हणून या आमदारांशी चर्चाही केली. अजित पवार या मतदानावर करडी नजर ठेवून आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आज सकाळपासूनच सक्रिय झालेले पाहताना दिसले. फडणवीस यांनी आमदारांना मतदान कसं करायचं हे दाखवतानाच मतपत्रिकेची घडी कशी मारायची याचं प्रात्यक्षिकही दाखवलं. तसेच मतदान करताना सावकाश मतदान करा. घाई गडबड करू नका, अशा सूचनाही फडणीसांनी आमदारांना दिल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही आमदारांना मतदान कसं करायचं याची माहिती दिली. तसेच मतदान फुटू नये म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. काँग्रेसकडे दुसऱ्या उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा कमी आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आमदारांशी संवाद साधून त्यांना काळजीपूर्वक मतदान करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सुहास कांदे यांनी जी चूक केली होती, त्याची पुनरावृत्ती करू नका. हे गुप्त मतदान आहे, याकडेही मुख्यमंत्र्यानी आमदारांचं लक्ष वेधल्याचं सांगितलं जातं.
दरम्यान, 11 वाजेपर्यंत भाजपच्या 81 आमदारांनी मतदान केलं आहे. तर काँग्रेसच्या चार आणि राष्ट्रवादीच्या 45 आमदारांनी मतदान केलं आहे. 11 वाजेपर्यंत एकूण 142 आमदारांनी मतदान केलं आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वच आमदारांचे मतदान झालेले असेल असं सांगितलं जात आहे.