मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या ठाकरी शैलीतून विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवताना अनेकदा पाहायला मिळतात. अनेकदा त्यांच्या शाब्दिक कोटीमुळे विरोधक घायाळही होतात. असाच एक टोला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. साताऱ्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या इमारतीचा ई-भूमिपूजन कार्यक्रम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीला दिलेल्या रंगावरुन नापसंती व्यक्त केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी रंगाच्या मुद्द्यावरुनच विरोधकांना टोला लगावलाय. (CM Uddhav Thackeray criticizes BJP at the inauguration ceremony of Satara Police Thane building)
पोलीस ठाण्याच्या इमारतीला दिलेला रंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पसंत पडला नाही. इमारतीला दिलेला रंग आपल्याला आवडला नसल्याचं अजित पवार म्हणाले. ‘पोलीस ठाण्याच्या इमारतीला दिलेला पिवळा आणि निळा रंगाचा पट्टा चांगला दिसत नसल्याचं म्हटलं. ज्या वेळेस सगळं काम पूर्ण होईल त्यावेळी चांगला रंग आपण इमारतीला देऊ’, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
“अजितदादा इमारतीच्या रंगाबद्दल बोलले, मला बरं वाटलं. मला वाटलं की मी एकटाच कलाकार आहे. हल्लीमाझी कला, फोटोग्राफी, चित्रकला बासनात गुंडाळली गेलेलीय. जे जे काही समोर दिसतं, अनेकजण अनेक रंग दाखवत आहेत. ते रंग बघावे लागतात. पण ते रंग बदलण्याचं धाडस असावं लागतं, ते धाडससुद्धा या सरकारमध्ये आहे. लोक नुसते रंग दाखवत आहेत, ते बघतोय आपण, पण त्याला काही अर्थ नाही. मात्र, एखादा रंग नाही आवडला तर तो रंग बदलण्याचं धाडस आपल्या सरकारमध्ये आहेत”, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.
शिवसेनेच्या वर्धापनदिनीही मुख्यमंत्र्यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला आणि विरोधी पक्ष भाजपला जोरदार टोला लगावला होता. भाजप सत्तेसाठी कासावीस झाला आहे. ज्यांना सत्तेची पोटदुखी झाली आहे. त्यांना मीच राजकीय औषध देणार आहे, असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसलाही इशारा दिला होता.
संबंधित बातम्या :
आधी स्वबळाची भाषा, आता दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना
परमबीर सिंग लेटरबॉम्ब, अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा, भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव
CM Uddhav Thackeray criticizes BJP at the inauguration ceremony of Satara Police Thane building