CM Uddhav Thackeray : आजी म्हणाल्या, साहेब, घाबरू नका मुंबईत शिवसेनाच येणार; उद्धव ठाकरे म्हणाले…
CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रभागा आजीच्या घरी आले. यावेळी त्यांनी आजींचे आशीर्वाद घेतले.
मुंबई: रणरणत्या उन्हात मातोश्रीच्या बाहेर खडा पहारा देणाऱ्या चंद्रभागा आजींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब चंद्रभागा आजीची (Chandrabhaga Shinde) भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी चंद्रभागा आजींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे (rashmi thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचं पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन स्वागत केलं. आजी 80 वर्षाच्या आहेत. पण आमच्या युवा सैनिक आहेत. त्यांच्यासारखे शिवसैनिक आहेत म्हणून आम्ही आहोत. शिवसेनाप्रमुखांनी हे शिवसैनिक मला आशीर्वाद म्हणून दिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तर हारेंगा नही, झुकेंगा नही साला असं म्हणत मुंबईत पुन्हा शिवसेनेचा येणार असं चंद्रभागा आजी म्हणाल्या. तर, तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रभागा आजीच्या घरी आले. यावेळी चंद्रभागा शिंदे आजींच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचं ओवाळून स्वागत केलं. यावेळी त्यांनी आजींचे आशीर्वाद घेतले. आदित्य आणि तेजस ठाकरे यांनीही आजींचे आशीर्वाद घेतले. तर, रश्मी ठाकरेंनी आजींना कडकडून मिठी मारली. यावेळी आजींनी आपल्या कुटुंबीयांचा मुख्यमंत्र्यांना परिचय करून दिला. आजी तुम्हीच लढलात का आमच्यासाठी. नमस्कार करतो, असं आस्थेवाईकपणे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी आजीने मुख्यमंत्र्यांना लग्न पत्रिका दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब आजीच्या कुटुंबासह फोटो काढले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या आजीला हारेंगा भी नही, झुकेंगा भी नही, हा डायलॉग पुन्हा म्हणायला लावला आणि आजीनेही हा संवाद म्हटला. मुख्यमंत्री सहकुटुंब घरी आले हे गेल्या 80 वर्षातील सर्वात मोठं गिफ्ट असल्याचं आजी म्हणाल्या.
मुख्यमंत्री आणि आजींचा संवाद
आजी: साहेब घाबरू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमचा आशीर्वाद तुमच्या पाठी आहे. मुंबईत शिवसेनाच येणार.
उद्धव ठाकरे: तुम्ही आहातच ना आमच्यासोबत. मी लहान असल्यापासून आजींना पाहतोय. त्या युवा सैनिक आहेत. मातोश्रीवरून रात्री घरी जा म्हणून तुम्हा सर्वांना सांगितलं. पण तुम्ही गेला नाहीत.
आजी: आता मला घर द्या… हा माझा नातू रविवारी लग्न आहे त्याचं.
उद्धव ठाकरे: किशोरीताई एकदा सर्वांना वर्षावर घेऊन या. मातोश्रीवर येतातच. पण वर्षावरही या.
आजी: साहेबांना भेटलो त्याचा आनंद झाला. साहेब आले, वहिनी आली. खूप आनंद झाला. तुमचे पाय आमच्या घराला लागले भरून पावलो.
उद्धव ठाकरे: असं नाही आजी. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुमच्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत. म्हणून आम्ही आहोत.
बाळासाहेबांचे शिवसैनिक झुकनेवाले नही
सर्वांच्या लक्षात असेल. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, व्यक्ती वयाने मोठी होत असते पण मनाने तरुण असली पाहिजे. ही आमची आजी असली तरी त्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. शब्दात बोलू शकत नाही. हे शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांच्या समोर नतमस्तक व्हायला आलो. काल त्या कडाक्याच्या उन्हात बसल्या होत्या. झुकेगा नही म्हणाल्या. बाळासाहेबांनी जे शिवसैनिक तयार केलेत ते झुकनेवाले नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.